युरोप किंवा रशिया यापैकी एकाची निवड करा
अमेरिकेचा चीनला सल्ला : दोघांसोबत वाटचाल करता येणार नाही
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
चीन एकाचवेळी युरोप आणि रशियासोबत चांगले संबंध राखू शकत नाही. चीन एकीकडे युरोपसोबत मजबूत संबंध बाळगून दुसरीकडे युक्रेन युद्धादरम्यान रशियाला समर्थन करू शकत नाही असे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या विदेश विभागाचे प्रवक्ते वेदांत पटेल यांनी यासंबंधीची भूमिका मांडली आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी चीन दौरा केला असून यादरम्यान चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी त्यांची गळाभेट घेतली आहे.
पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना हा युरोप आणि अन्य देशांसोबत दृढ संबंध इच्छितो. तर दुसरीकडे युरोपच्या सुरक्षेसाठी धोका ठरलेल्या रशियाला चीन मदत करत आहे. हे केवळ अमेरिकेचे मानणे नसून जी-7 देश, नाटो आणि युरोपीय देश देखील हेच मानत आहेत. रशियाला मदत करून चीन केवळ युक्रेनच्या सुरक्षेसाठी धोका वाढवत नसून युरोपच्या सुरक्षेलाही धोक्यात आणत आहे. हा प्रकार सुरू राहिल्यास चीन युरोपसोबत चांगले संबंध राखू शकणार नसल्याचे पटेल यांनी सुनावले आहे.
चीन दौऱ्यावर पुतीन
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे चीन दौऱ्यावर आहेत. रशियाचे राष्ट्रपती म्हणून पाचवा कार्यकाळ सुरू झाल्यावर पुतीन यांनी पहिल्या विदेश दौऱ्यासाठी चीनची निवड केली आहे. पुतीन यांनी या दौऱ्यात चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली. तसेच दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत अमेरिकेवर निशाणा साधला. अमेरिका आण्विक संतुलन बिघडविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप दोन्ही नेत्यांनी केला. रशिया-चीन संरक्षण भागीदारी वाढविण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली आहे. युक्रेन युद्धाला राजनयिक कराराच्या अंतर्गत निकाली काढण्याच्या बाजूने चीन आहे. रशिया आणि चीनची मैत्री जगात सुरू असलेल्या वर्चस्वाच्या लढाईत स्थिरता आणण्याचे काम करत असल्याचा दावा जिनपिंग यांनी केला आहे.
रशियाने घ्यावी माघार
युक्रेन युद्धावर आमच्या दृष्टीकोनातून तोडगा अत्यंत सोपा आहे. रशियाने युक्रेनमधून माघार घ्यावी. रशियाने स्वत:च्या कब्जातील युक्रेनचे भूभाग परत करावेत. याच्या माध्यमातून शांततेच्या मार्गाने हा प्रश्न निकालात काढता येईल. परंतु रशियाचे राष्ट्रपती पुतीन हे शांततेसाठी तयार नसल्याचा आरोप अमेरिकेच्या विदेश विभागाचे प्रवक्ते वेदांत पटेल यांनी केला आहे.
चीन-रशिया भावासारखे
जिनपिंग हे रशियाकडून स्वस्त दरात नैसर्गिक वायूची आयात आणि पॉवर ऑफ सायबेरिया पाइपलाइनविषयी आग्रही आहेत. या पाइपलाइनद्वारे रशिया सायबेरिया ते मंगोलियाच्या मार्गे चीनला नैसर्गिक वायूचा पुरवठा करतो. रशिया आणि चीन हे भावासारखे आहेत असे उद्गार पुतीन यांनी काढले आहेत. पुतीन यांनीचीनच्या हार्बिन शहराला भेट दिली आहे. याला चीनचे ‘लिटिल मॉस्को’ म्हटले जाते.1917-22 दरम्यान रशियात गृहयुद्ध सुरू असताना हजारो रशियन नागरिकांनी हार्बिन शहरात धाव घेतली होती. तेव्हा मॉस्कोपासून ब्लादिवोस्तोक शहराला जोडण्यासाठी हार्बिनमार्गे रेल्वेमार्ग निर्माण करण्यात आला होता. 1940 मध्ये जपानसोबत झालेल्या युद्धादरम्यान मारले गेलेल्या सोव्हियत सैनिकांना पुतीन यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.