Vari Pandharichi 2025: चोखियाचा कर्ममेळा
मीरा उत्पात-ताशी :
महाराष्ट्रात विठ्ठलभक्तीचा पाया रचलेल्या भागवत धर्माने सगळ्या जातीधर्माच्या लोकांना आपलेसे केले. त्यात अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या जातीतून संत चोखामेळा हे विठ्ठल भक्त उदयास आले. त्यांनी निष्काम विठ्ठल भक्ती केली. त्यांच्या या भक्तीला भुलून देवाने त्याला आपल्या हृदयात स्थान दिले. तरीही चोखामेळ्याने स्वत:साठी काही मागितले नाही. तो कुठलीही अपेक्षा न करता निरतिशय विठ्ठल भक्ती करत राहिला. त्याच्या अभंगात विद्रोह नाही. आपल्याला मिळणाऱ्या अस्पृश्य वागणुकीबाबतही तो फारशी तक्रार करत नाही. त्याच्या अभंगातून पारंपरिक भक्ती आणि विठ्ठलावरील निष्ठा दिसून येते. चोखामेळयाचे लग्न सोयराबाईशी झाले होते. त्यांना कित्येक वर्षे मूल झाले नाही. यामुळे चोखोबा पेक्षा सोयराबाई जास्त दु:खी होती. चोखोबा विठ्ठलाला याबाबत काही तक्रार करत नाहीत. पण सोयराबाई मात्र विठ्ठलाला म्हणते, पोटीही संतान न देखेची काही। वाया जन्म पाही झाला माझा
विठ्ठलाला तिचे दु:ख समजते. तो दीन वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन तिच्या घरी येतो. सोयराबाईची विचारपूस करतो. सोयराबाई त्याला दंडवत घालते. म्हणते की, ‘माझ्या घर धन्याला विठोबाचा छंद आहे. सारे सुख आहे पण पोटी संतान नाही’. मग ब्राह्मण तिचे सारे ऐकून म्हणतो ‘मला खूप भूक लागली आहे. मला काही तरी खायला दे’. त्यावर सोयरा म्हणते ‘आम्ही महार आहोत. तुम्हाला कसे खायला देणार’, यावर तो वृद्ध म्हणतो ‘भुकेने माझा जीव चालला आहे. मला काही तरी खायला दे. नाही तर माझे प्राण जातील.’ सोयरा अडचणीत येते. नाईलाजाने काल रात्री राहिलेला शिळा भात दही दूध घालून कालवून आणते. त्या भातातला एक घास काढून तो ब्राह्मण तिला देतो. उरलेला भात खाऊन तृप्त होतो आणि तिला मूल होण्याचा आशीर्वाद देऊन निघून जातो. कालांतराने तिला दिवस जातात. बाळंतपणाची वेळ जवळ येते. बाळंतपण करण्यासाठी चोखोबा निर्मळेला आणायला जातो. पण काही अडचणीमुळे तिला यायला उशीर होतो. त्यावेळी स्वत: विठ्ठल सोयराबाईचे बाळंतपण करतो.
तिला मुलगा होतो. सारे घर आनंदून जाते. चोखामेळ्याला हा प्रकार कळाल्यावर देवाला आपल्यामुळे त्रास झाला म्हणून वाईट वाटते. पण त्याची विठ्ठलावरील श्रद्धा अधिकच दृढ होते. मुलाच्या बारश्याला साक्षात विठ्ठल रुक्मिणी मोठा आहेर घेऊन येतात. मुलाचे नाव कर्ममेळा ठेवतात.
लहानपणापासून विठ्ठल भक्ती कानावर पडल्याने तो सुद्धा विठ्ठल भक्ती करू लागतो. चोखामेळ्याची परंपरा पुढे चालवतो. कर्ममेळा आर्ततेनं विठ्ठल भक्ती करतो पण त्याला आपल्या उपेक्षित स्थितीची जाण आहे. तो याबाबत निर्भीडपणे विठ्ठलाला
आमुचे केली हीन याती। तुज का न कळे श्रीपती।
जन्म गेला उष्टे खाता। लाज न ये तुमचे चित्ता।
आमुचे घरी भात दही। खावोनी कैसा म्हणसी नाही।
म्हणे चोखियाचा कर्ममेळा। का सया जन्म दिला मला।
असा जाब विचारतो. त्याच्या अभंगात उत्कट भाव आहेत. भाषा सोपी वापरली आहे. कर्ममेळा चोखोबाप्रमाणे विठ्ठलाशी संवाद साधतो. आपले गाऱ्हाणे मांडतो. त्याला तत्कालीन संतांचा सहवास लाभला आहे. त्यामुळे त्याच्यावर दिव्य संस्कार झाले आहेत. तो त्याबद्दल देवाचे ऋण मानतो. त्याला म्हणतो, संतांची संगती आवडे या जीवा। आणिक केशवा दुजे नको। असा हा विठ्ठलाच्या कृपाप्रसादाने झालेला कर्ममेळा किती भाग्यवान! त्याला सदैव विठ्ठल आणि संतांचा सहवास लाभला. विपरीत सामाजिक परिस्थिती, उपेक्षा, अवहेलना मिळून सुद्धा त्याची विठ्ठल भक्ती तसूभरही कमी झाली नाही!