महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

घोषणांच्या पावसात भिजलेले चॉकलेट!

06:47 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महाराष्ट्रात महायुतीने महिला, शेतकरी यांच्यापासून तृतीयपंथीयांपर्यंत सर्वांना खुश करण्याचे धोरण अर्थसंकल्पातून पुढे आणले आहे. मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्याच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करतानाच कृषी वीज माफीपासून लाडकी बहीण योजनेपर्यंत केवळ लोकप्रिय घोषणा केल्याने सरकारला लाभ होईल का? हा प्रश्नच आहे. घोषणांच्या बरसातीत सरकारचे चॉकलेट भिजले आहे. तीन महिने त्याला टिकाव धरायचा आहे आणि लोकांना संतुष्ट देखील करायचे मुश्किल काम पार पाडायचे आहे.

Advertisement

अर्थसंकल्प सादर होण्याच्या पूर्वसंध्येला आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होण्याच्या मुहूर्तावर उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील ठाकरेंच्या शिवसेनेच्या तंबूत चॉकलेट घेऊन पोहोचले होते. अर्थातच अपेक्षेप्रमाणे दादांची ही कृती भाव खाऊन गेली. पण काहींनी दात ओठ नक्कीच खाल्ले असतील. दादांनी निवडणूक काळात मुलींचे शिक्षण मोफत करण्याची घोषणा केली होती आणि शैक्षणिक वर्ष सुरू होताना सरकार त्यावर काही बोलत नाही म्हटल्यानंतर जनतेतून सातत्याने विचारणा होऊ लागली होती. त्याला उत्तर देणेही सरकारला मुश्किल होते. मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मान्यता मिळावी यासाठी दादांनी खूप प्रयत्न केला. मात्र एकट्या भाजपला याचे श्रेय जाऊ देतील तर ते अजित दादा कसले? त्यांनी ही घोषणा अर्थसंकल्पात करू असे सांगून विषय आपल्या घोषणेसाठी राखून ठेवला. यापूर्वी प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने कोणाचीही मागणी नसताना घेतला. त्याची घोषणाही झाली. आता त्यावर अर्थसंकल्पात पुंडलिक वरदा...म्हणण्यात आले. पण याने तुकारामांच्या वारीत अनुदान लाटू मंबाजीच्या दिंड्या वाढतील त्याचे काय? सरकारने मध्यप्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहीण योजना आणली आहे. पुढच्या महिन्यात त्याची तातडीने अंमलबजावणी सुरू करायची असा सरकारचा मनसुबा आहे. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या तोंडावर अचानक सरकारने सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचे सुतोवाच मुख्य सचिवांना पुढे करून केले. आश्रम शाळेच्या शिक्षकांसाठी शाळेच्या वेळा बदलण्याचा निर्णय तडकाफडकी घेतला. ज्याला जशा घोषणा हव्यात तशा त्या देण्यावर सरकारने भर दिला आहे. राज्यात तीन पक्ष आणि अगणित मित्र पक्षांचे सरकार आहे. प्रत्येकाला या सरकारमधून काहीतरी घोषणा करून हवी आहे. ती आपल्या उपस्थितीत आणि आपल्या मागणीनुसार व्हावी अशी प्रत्येकाची मागणी आहे. त्याचा परिणाम म्हणून जो तो आपल्या मनात येईल त्या घोषणा करून सरकार भविष्यात असे धोरण आखेल अशी ग्वाही देत आहे. निवडणुकीत केलेल्या भाषणांप्रमाणे निर्णय व्हावेत ही त्यांची अपेक्षा चुकीचीही नाही. पण, आठ लाख कोटीचे कर्ज डोक्यावर घेऊन वाटचाल करणाऱ्या, प्रत्येक आमदाराला भरघोस विकास निधी देण्यासाठी मागणी पत्रांवर भराभर स्वाक्षऱ्या देणाऱ्या सरकारला सगळ्या घोषणा पूर्ण करण्यासाठी पैसा येणार कुठून? याचे उत्तर मात्र सांगता येत नाही. महाराष्ट्रातील कंत्राटदारांचे जितके पैसे थकले आहेत त्याची वसुली दूरच राहिली, कार्यकर्ते नवनवीन कामे मंत्रालयातून मंजुरी घेऊन येत आहेत. मात्र, राज्यातील अनेक नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदांवर प्रशासक असल्याने तिथल्या अधिकारी मंडळींचा भाव वधारला आहे. परिणामी खूप स्फोटक परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर निर्माण झाली आहे. मात्र आता अवघे तीन महिने राहिलेले असल्याने असेच रेटत न्यायचे असे बहुदा सरकारने ठरवले असेल.

Advertisement

 भाजपमधील अस्वस्थता

भाजपमधील अस्वस्थता अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पायऱ्यांवर उघड झाली. प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या एकनाथ खडसे यांनी माधुरी मिसाळ आणि अतुल भास्कर कर या आमदारांसमोर नव्या लोकांना संधी दिली जाते आणि आपल्यासारख्या ज्येष्ठांना थांबा म्हटले जाते, याबद्दल खंत व्यक्त केली. त्यापूर्वी भाजपला मानणारे आणि त्यांच्या विचारांची पाठराखण करणारे युट्युबर भाजप आयटीसेलच्या राज्य प्रमुख श्वेता शालिनी आणि त्यांच्या कारभारावर संतापलेले दिसले. भाऊ तोरसेकर यांनी केलेली टीका सहन न झालेल्या शालिनी यांनी त्यांना कोर्टाची नोटीस पाठवली. त्यामुळे संतप्त भाऊंनी आणखी वाभाडे काढले. त्यांच्यासोबतच्या इतर काही मंडळीनी काही कोटींची रक्कम गेली कुठे? असे प्रश्न करून या पक्षात सुरू असणाऱ्या दुष्कृत्यांवर जोराचा हल्ला चढवला. आपल्या विरोधातील ही कृती देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आहे आणि ते करणारे भाजपच्या पदाधिकाऱ्यांपैकी काही आहेत असे सांगता सांगता त्यांनी भारतीय जनता पक्षातील काही ‘भारतीय’ मंडळींचे कारनामे यांना उघड करण्याची भाषा केली. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण सुटेपर्यंत पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याचा एक व्हिडिओ बाहेर पडला ज्यामध्ये अजित पवार यांच्या विरोधात कार्यकर्ते टोकाची टीका करत असल्याचे आणि आपण सत्तेवर कशाला यायचे? अजित पवार आपल्या जीवावर पुण्याचे पालकमंत्री होणार असतील आणि आपल्यावरच सूड उगवला जाणार असेल तर अशी सत्ता न आलेली बरी अशी टीका त्यांनी केली.

हे सगळे डिजिटल मीडियावर पाहणारे भाजपचे मतदार यातून किती दुखावले असतील याचा विचार करेल तेवढा थोडाच.  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यापुढे आपले डबल इंजिन सरकार असेल असे वक्तव्य करून दादा गटाला दुखावले आहे. ठाकरे आणि फडणवीस योगायोगाने एका लिफ्टमधून गेले आणि मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयाचा सहावा मजला ठाकरेंपासून खूप दूर राहील अशी भविष्यवाणी केली. जनतेला चॉकलेट वाटताना आपल्या नात्यातील गोडवा कमी झाला आहे याची जाणीव सत्ता पक्षाला दिसत नाही. उलट प्रत्येक जण उट्टे काढण्याची संधी शोधत आहे, हे उघडपणे दिसत असताना भाजपश्रेष्ठी शांत आहेत हे विशेष.

शिवराज काटकर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article