चित्रावेल, शैली सिंग यांची चमक
वृत्तसंस्था/ बेंगळूर
मंगळवारी येथे झालेल्या इंडियन ग्रां प्री-1 अॅथलेटिक्स स्पर्धेत आशियाई क्रीडा स्पर्धेतील कास्य विजेत्या प्रवीण चित्रावेलने तिहेरी उडीमध्ये सुवर्णपदक मिळविले. पण त्याला पॅरिस ऑलिंपिकसाठीची पात्रता मर्यादा गाठता आली नाही. तसेच उत्तरप्रदेशची महिला अॅथलिट शैली सिंगने लांब उडीत सुवर्णपदक पटकाविले पण तिलाही ऑलिंपिकसाठीची पात्रता मर्यादा पार करता आली नाही.
तामिळनाडूचा अॅथलिट प्रवीण चित्रावेलने पुरूषांच्या तिहेरी उडी प्रकारात चौथ्या प्रयत्नात 17.12 मी.चे अंतर नोंदवित सुवर्णपदक मिळविले. बर्मिंगहॅम राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या पॉलला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने 16.29 मी.चे अंतर नोंदविले. महिलांच्या लांब उडी प्रकारात उत्तरप्रदेशच्या शैली सिंगने केरळच्या नैना जेम्सला मागे टाकत सुवर्णपदक पटकाविले. 20 वर्षांखालील वयोगटाच्या विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेत शैली सिंगने पदक पटकाविले होते. 20 वर्षीय शैली सिंगने 6.52 मी.चे अंतर नोंदविले. केरळच्या 28 वर्षीय नैया जेम्सने 6.44 मी. चे अंतर नोंदवित दुसरे स्थान आणि रौप्यपदक घेतले. पॅरिस ऑलिंपिकसाठी महिलांच्या लांब उडी प्रकारात 6.86 मी. ची पात्रता मर्यादा ठेवण्यात आली आहे. पुरूषांच्या लांब उडीमध्ये मध्यप्रदेशच्या आदित्य कुमार सिंगने 8.01 मी. चे अंतर नोंदवित सुवर्णपदक मिळविले. पुरूषांच्या भालाफेक प्रकारात कर्नाटकाच्या मनु डीपीने अपेक्षेप्रमाणे सुवर्णपदक घेताना 81.91 मी. चे अंतर नोंदविले. पण त्याला ऑलिंपिक पात्रतेची मर्यादा गाठता आली नाही. ही मर्यादा 85.50 मी. ठेवण्यात आली आहे. पुरूषांच्या भालाफेक प्रकारात भारताचा ऑलिंपिक आणि विश्व चॅम्पियन नीरज चोप्रा आणि आशियाई स्पर्धेतील पदक विजेता किशोरकुमार जेना यांनी आपले पॅरिस ऑलिंपिकचे तिकीट निश्चित केले आहे. ओडिशाच्या अनिमेश कुजुरने पुरूषांच्या 100 मी. व 200 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकांची कमाई केली. 100 मी. धावण्याच्या शर्यतीत त्याने 10.51 सेकंदाचा तर 200 मी. धावण्याच्या शर्यतीत त्याने 20.97 सेकंदाचा अवधी घेतला. महिलांच्या विभागात तेलंगणाची नित्या गंधे ही सर्वात वेगवान धावपटू ठरली. तिने 100 मी. धावण्याच्या शर्यतीत 11.78 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक तर महिलांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत आंध्रप्रदेशच्या चेलिमीने 23.92 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक घेतले. हिमा दासला ही शर्यत पूर्ण करता आली नाही.