For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Konkan News : 'मान्सूनपूर्व'मुळे कोकणात चिरेखाण व्यवसाय बुडाला, 50 कोटींचे नुकसान

10:46 AM Jun 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
konkan news    मान्सूनपूर्व मुळे कोकणात चिरेखाण व्यवसाय बुडाला  50 कोटींचे नुकसान
Advertisement

 कामगारांनी 'हिशोब' पूर्ण करून धरला घरचा रस्ता, 1 हजार व्यावसायिक

Advertisement

By : मनोज पवार

दापोली : मे महिन्याच्या मध्यावरच मान्सूनपूर्व पावसाने जिह्यात जोरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील चिरेखाण व्यवसायाला त्याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. जिह्यातील सुमारे 1 हजार चिरेखाण मालकांचे जवळपास 50 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पावसाच्या अंदाजामुळे बहुतांशी कामगारांनी आपला ‘हिशोब’ पूर्ण करुन घरचा रस्ता धरला आहे.

Advertisement

जिह्यातील चिरेखाण व्यवसाय खूप मोठा आहे. राज्यासह राज्याच्या बाहेरदेखील जिह्यातील चिऱ्यांना मोठी मागणी असते. रत्नागिरी व काही प्रमाणात सिंधुदुर्ग जिह्यात मिळणारा लाल भडक रंगाचा जांभा चिरा अन्य कोणत्याही जिह्यात मिळून येत नाही. यामुळे रत्नागिरी जिल्हा व जांभा चिरा याचे एक समीकरण तयार झालेले आहे.

हा चिरा घर बांधणीबरोबर सुशोभिकरणाच्या कामासाठी, रस्ते बांधणीसाठीदेखील मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतो. म्हणूनच रत्नागिरीतील चिऱ्याला मोठी मागणी असते. त्यामुळेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हा व्यवसाय बहरला आहे.

पावसाने उभा केला अडचणींचा डोंगर

एप्रिल व मे महिने हे चिरेखाण व्यावसायिकांचे अत्युच्च मागणीचे महिने म्हणून ओळखले जातात. ज्यांच्या घराच्या घराचे स्लॅबचे काम झालेले आहे असे नागरिक पावसाळ्यातही अंतर्गत बांधकाम करतात. शिवाय ज्यांना पावसानंतर काम करायचे आहे ते चिरा विकत घेऊन पावसामध्ये भिजवतात.

यामागे चिरा अधिक टिकाऊ होतो असा समज आहे. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात या चिऱ्यांना मोठी मागणी असते. मात्र यावर्षी मे महिन्याच्या मध्यावरच अवकाळी पावसाने जिह्यात जोरदार हजेरी लावली. यामुळे खाणींवर जाणारे डंपरचे व गाड्यांचे रस्ते चिखलाने भरून ते बंद झाले. शिवाय चिरे खाणींमध्येदेखील पाणी तुंबल्याने चिरे काढणे कठीण झाले.

त्यातच हवामान विभागाने मान्सून आल्याचे जाहीर केले. यामुळे सर्व चिरेखाण कामगारांना परतीचे वेध लागले. पाऊस थांबत नाही असे पाहून जिह्यातील जवळजवळ 99 टक्के कामगारांनी आपापला हिशोब पूर्ण करून गावचा रस्ता धरला. यामुळे सध्या जिह्यातील चिरेखाणी ओस पडलेल्या आहेत.

5 जूनपर्यंत सुरू असतो व्यवसाय

सध्या दापोलीत 60 तर जिह्यामध्ये सुमारे 1 हजार चिरेखाण व्यावसायिक आहेत. हा व्यवसाय दसऱ्यापासून पुढे 5 जूनपर्यंत सुरू असतो. 6 जून दरम्यान पावसाचा अंदाज आल्यावर घाटमाथ्यावरून कोकणात चिरे खाणींवर कामाकरिता येणारे कामगार आपापल्या गावी शेतीच्या कामाला जाण्याची लगबग करतात.

जाताना ते वर्षभराचा सर्व हिशोब घेऊन जातात. जिह्यात कामाला येताना ठेकेदाराकरवी ते अंगावर उसणे पैसेदेखील घेतात. एका ठेकेदाराकडे सुमारे 10 जोड्या असतात. या जोड्या दिवसाला 1500 ते 1800 रुपये दिवसभर मेहनत करून कमवतात.

हे सर्व कामगार विजापूर परिसरातून कोकणात येतात. कामावर रुजू होण्यापूर्वी मुकादम प्रत्येक चिरेखाण मालकाकडून 7 ते 8 लाख रुपये ऊचल घेतो. यामुळे चिरेखाण मालक व मुकादम हे एकमेकांना बांधील रहातात.

नुकसानीचा सारा भार चिरेखाण मालकांवरच

एप्रिल व मे महिन्याच्या कालावधीत प्रत्येक चिरेखाण मालकाचा साधारण 4 ते 5 लाख रुपयांचा व्यवसाय होतो. या हिशोबाने जिह्यातील सुमारे 1 हजार चिरेखाण मालकांचे सुमारे 50 कोटी रुपयांचे नुकसान या अवकाळी पावसाने झाले आहे.

चिरेखाणीच्या व्यवसायात नुकसान झाल्यास शासनाकडून कुठल्याही प्रकारची सबसिडी मिळत नाही. शासनाची कोणतीही मदत योजना नाही. यामुळे हे सर्व नुकसान चिरेखाण मालकांना सहन करावे लागणार असल्याची खंत दापोली चिरा व्यवसायिक संघटनेचे सचिन डोंगरकर यांनी व्यक्त केली.

Advertisement
Tags :

.