For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापुरातील वाड्यांची वाडी 'भुयेवाडी' तुम्ही पाहिलीये का?

04:10 PM Apr 29, 2025 IST | Snehal Patil
कोल्हापुरातील वाड्यांची वाडी  भुयेवाडी  तुम्ही पाहिलीये का
Advertisement

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुमारे शंभरावर चिरेबंदी वाडे या गावात होते.

Advertisement

By : सतीश पाटील 

कोल्हापूर (भुयेवाडी) : चिरेबंदी वाड्याचे गाव म्हणून प्रसिद्ध असणारे करवीर तालुक्यातील भुयेवाडी काळाच्या ओघात काँक्रीटच्या जंगलात हरवत चालले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुमारे शंभरावर चिरेबंदी वाडे या गावात होते. पण बदललेली जीवनशैली आणि वाड्याच्या देखभालीचा खर्च परवडत नसल्याने भुयेवाडी हे गाव आपली मूळ ओळख हरवत चालले आहे. उरले-सुरले वाडे अखेरची घटका मोजत आहेत.

Advertisement

या गावापासून काही अंतरावर तयार झालेली वस्ती (वाडी) म्हणजे आजचे भुयेवाडी होय. अठराव्या शतकाच्या शेवटी पटकी व प्लेग सारख्या साथीच्या रोगाने अनेक गावे निर्मनुष्य झाली. त्यावेळी गावापासून दूर आणि डोंगर पायथ्याला शेती असणाऱ्या लोकांनी स्वत:ला गावापासून लांब करत चिरेबंदी वाड्यांची ही वाडी वसवली. त्यालाच आज भुयेवाडी असे म्हणतात.

सुरुवातीला या ठिकाणी भोसले (नाईक), भोसले (मुंगळीकर) सरकार, पाटील, कुलकर्णी अशा घराण्यांनी टोलेजंग वाडे बांधले. हे वाडे आठ गुंठ्यापासून वीस गुंठ्यापर्यंतच्या प्रशस्त जागेत होते. वाड्याचे संपूर्ण बांधकाम हे पांढऱ्या मातीत केलेले होते. वाड्याच्या भिंती साधारणत: चार ते साडेचार फूट रुंदीच्या असायच्या. दगडी कोरीव बांधकाम, वरचा टप्पा विटांनी बांधलेला, लाकडांचा वापर करून छत बनवलेले असायचे.

छतावर पूर्वीच्या काळीच्या साध्या खापऱ्या असायच्या. पावसाळ्यापूर्वी याची शेखरणी करावी लागे. नंतरच्या काळात वाड्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी कुशल मनुष्यबळ मिळेनासे झाले. आणि पडलेले वाडे नादुरुस्त अवस्थेत तसेच पडून राहिले. नंतरच्या काळात ही जमीन वापरात आणण्यासाठी तेथे काँक्रीटच्या इमारती उभ्या राहिल्या. आणि वाड्यांची जागा काँक्रीटच्या इमारतींनी घेतली. आणि वाड्यांचे गाव अशी ओळख असणारे भुयेवाडी आपल्या ऐतिहासिक वारसा पासून दूर निघाले.

संस्थान काळात राजे, महाराजाचे यांचे राजवाडे असायचे आणि ग्रामीण भागात सरदार, सरकार, सावकार, गावपाटील, मोठे जमीनदार, वतनदार यांची घरे म्हणजे वास्तुशास्त्राचा अद्भूत नमुना असणारे वाडे. लाकडी नक्षीदार असा भव्य दरवाजा, त्याच्या आत अजून एक लहान दरवाजा, मोठे आंगण, लांब पडवी, चौक, प्रशस्त ओटे, अनेक खोल्या आणि पोट माळे असणारे दुमजली घर अशी या वाड्यांची रचना ठरलेली.

काही वाड्यांमध्ये कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था म्हणून आड असायचे. अशा सर्व सोयी नियुक्त वाड्यात माणसांचा राबता ही मोठा असायचा. कुटुंब प्रमुखाला मान असायचा आणि एकत्र कुटुंब संस्कृतीमध्ये वाड्याला अनन्यसाधारण महत्त्व असायचे. एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू लुप्त होत आहे. तसे वाडे ही दिशेनासे होत आहेत. वाडा संस्कृती पूर्णत: नष्ट झालेली नसली तरी वाड्यांची संख्या प्रचंड कमी झालेली आहे.

बदललेली जीवनशैली आणि वाड्याच्या देखभाल दुरुस्तीचा न परवडणारा खर्च हे त्याचे एक कारण असू शकते. karveमात्र ग्रामीण भागात काही ठिकाणी आजही वाड्याची घरे पहायला मिळतात. काही कुटुंबे नोकरी व्यवसायाच्या निमित्य शहरात राहायला गेल्याने वाड्यांची दुरावस्था झाली वाड्यांची रचना वाडा हा एक सोपी, दोन सोपी, तीन सोपी व चार सोपी अशी चार प्रकारात असायचे. बहुतांश वाड्यांचा दरवाजा हा प्रशस्त लाकडी नक्षीदार, दगडी कोरीव बांधकाम, वरचा टप्पा विटांनी बांधलेला, लाकडांचा वापर करून छत बनवलेले असायचे.

छतावर पूर्वीच्या काळातील साध्या मातीच्या पन्हाळी खापऱ्या असायच्या. वाड्याचे संपूर्ण बांधकाम हे पांढऱ्या मातीत केलेले असायचे. वाड्याच्या भिंती साधारणत: चार ते साडेचार फूट रुंदीच्या असायच्या. वाड्याच्या दरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर दगडी फरशा घातलेला चौक आणि या चौकामध्ये वाड्यातील कुटुंब प्रमुखांची बैठक व्यवस्था अशी साधारणत: वाड्यांची रचना असायची.

"आमचा वाडा चौसोपी आहे. 20 गुंठ्यामध्ये बांधकाम केलेले आहे. हा वाडा 18व्या शतकातील आहे. त्याच्या भिंती साडेचार फूट जाडीच्या आहेत. दोन-तीन कन्नड चित्रपटांचे शूटिंग आमच्या वाड्यात झाले आहे."

- मधुकर गणपती पाटील, भुयेवाडीचे पहिले सरपंच

"18व्या शतकाच्या शेवटी आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला या ठिकाणी भोसले (नाईक), भोसले (मुंगळीकर) सरकार, पाटील, कुलकर्णी अशा घराण्यांनी टोलेजंग वाडे बांधले. या कुटुंबीयांकडे मोठ्या प्रमाणात जमिनी होत्या. पुढील काळात या जमिनीत कामाला असणारे बारा बलुतेदार या वस्तीत स्थिरावले."

- पांडुरंग भोसले, सरकार

"या बदललेल्या जीवनशैलीमुळे गावातील वाड्यांची संख्या कमी झाली आहे. सिमेंट-काँक्रीटच्या बंगल्यांची संख्या वाढली आहे. गावची लोकसंख्या सुमारे सहा हजार आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे गावाचा विस्तार झाला आहे. हरणेश्वर नगर, श्री दत्तनगर, जय मल्हार नगर, खोतवाडीपर्यंत आता गाव पसरले आहे."

- सचिन देवकुळे, सरपंच भुयेवाडी

"आमचा वाडा गावात भगवंतांचा वाडा म्हणून ओळखला जातो. वाड्याची डागडुजी करताना बदलत्या काळानुसार 20टक्के बदल केला असला तरी 80 टक्के वाडा हा पूर्वी होता तसा जपला आहे. त्यामुळे ऋतू बदलानुसार आमच्या वाड्यातील तापमान ही मेन्टेन होते. त्यामुळे वाड्यात वास्तव्य करणे आरोग्यासाठी चांगले आहेत."

- प्रा. माणिक पाटील

Advertisement
Tags :

.