चिराग चिकराला कुस्तीत सुवर्णपदक
वृत्तसंस्था/टिरेना (अल्बेनिया)
विश्वकुस्ती फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या 23 वर्षांखालील वयोगटाच्या विश्वकुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताचा मल्ल चिराग चिकराने पुरुषांच्या 57 किलो फ्रिस्टाईल गटात सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत भारताने 9 पदकांची कमाई केली असून त्यामध्ये 1 सुवर्ण आणि 1 रौप्य पदकाचा समावेश आहे.
पुरुषांच्या 57 किलो फ्रिस्टाईल गटातील अंतिम लढतीत चिराग चिकराने किर्जिस्थानच्या कॅरेचोव्हचा 4-3 अशा गुण फरकाने निसटता पराभव करत सुवर्णपदक मिळविले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कुस्ती प्रकारात पदक मिळविणारा चिकरा हा दुसरा भारतीय मल्ल आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या अमन सेरावतने कास्यपदक घेतले होते. तर 2022 च्या विश्व कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत अमन सेरावतने सुवर्णपदक घेतले होते. गेल्या वर्षी झालेल्या या स्पर्धेत महिलांच्या विभागात भारताच्या ऋतिका हुडाने 76 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकाविले होते. 2018 साली झालेल्या 23 वर्षाखालील वयोगटाच्या विश्व चॅम्पियनशीप कुस्ती स्पर्धेत रवीकुमार दाहियाने रौप्य पदक मिळविले होते.
या स्पर्धेत भारताने पुरुषांच्या फ्रिस्टाईल गटात दोन कास्यपदके मिळवून गुणतालिकेत 82 गुणांसह चौथे स्थान पटकाविले. इराणने 128 गुणांसह पहिले, जपानने 102 गुणांसह दुसरे तर अझरबेजानने 100 गुणांसह तिसरे स्थान घेतले आहे. पुरुषांच्या फ्रिस्टाईल प्रकारामध्ये भारताने एकूण 4 पदकांची कमाई करत चौथे स्थान मिळविले आहे. भारताच्या व्हिकीने युक्रेनच्या इव्हानचा 7-2 अशा गुणांनी पराभव करत पुरुषांच्या 97 किलो फ्रिस्टाईल गटात कास्यपदक घेतले. पुरुषांच्या 70 किलो फ्रिस्टाईल गटात भारताच्या सुजित कालकलने कास्यपदक मिळविले.
या स्पर्धेत महिलांच्या विभागात भारतीय महिला मल्लांनी एकूण 4 पदकांची कमाई केली. अंजलीने 59 किलो वजन गटात रौप्य, नेहा शर्माने 57 किलो गटात, शिक्षाने 65 किलो गटात् आणि मोनिकाने 68 किलो गटात कास्यपदके मिळविली. पुरुषांच्या 55 किलो ग्रिकोरोमन लढतीत भारताच्या विश्वजित मोरेने कास्यपदक पटकाविले.