चिपी - मुंबई परतीचा विमान प्रवास होतोय महाग
डायनॅमिक तिकिट दराचा प्रवाशांना फटका
कुडाळ / प्रमोद ठाकूर
कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा गणेश चतुर्थी उत्सव ७ सप्टेंबर पासून सुरू होत आहे. मात्र कोकणात येण्यासाठी रेल्वे तिकिट आधीच फूल्ल झाली आहेत तर, मुंबई- चिपी सिंधुदुर्ग विमान सेवेचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने गणेश भक्तांना विमानाने गावी येणे परवडणारे नाही. चिपी- मुंबई परतीच्या विमानसेवेला डायनॅमिक तिकिट दर लावत असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
चतुर्थी कालावधी अगोदर मुंबईहून चिपीला येणाऱ्या विमानसेवेचे दर १०,००० रुपये तर पाच दिवसांच्या कालावधीनंतर मुंबईला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटाचे दर ९००० रुपयांच्या घरात पोचले आहेत. आठवड्यातून केवळ चार दिवस व ७२ आसनी छोट्या विमानाची दैनिक एकच फेरी होत असल्याने प्रवासी क्षमताही कमीच आहे. विमानाचे तिकीट दर डायनॅमिक पद्धतीने नुसार वाढत असल्याने लोकांच्या खिशाला वाढीव तिकीट दराचा भुर्दंड पडत आहे. त्यामुळे चतुर्थी कालावधीत प्रवाशांच्या सेवेसाठी वाढीव व रोज विमान सेवा चालवावी व माफक तिकीट दर ठेवावेत. एकीकडे चिपी विमानसेवेचे दर गगनाला भिडलेले असताना त्याच कालावधीत शेजारील मोपा विमानतळावर उतरणाऱ्या विमानांचे तिकीटदर मात्र आवाक्यात आहेत. सिंधुदुर्ग साठी जी दरप्रणाली लावली आहे ती रद्द करून नियमित तिकिट कर ठेवावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कोकणी माणूस कुठेही असला तरी गणपती सणासाठी आपल्या गावची वाट धरतोच. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विक्रमी संख्येने विशेष रेल्वेगाड्या सोडूनही प्रवाशांची प्रतिक्षा यादी संपत नाही आहे. दुसरीकडे स्वतःच्या वाहनाने रस्ते मार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी कित्येक वर्षापासून अपूर्ण अवस्थेत आणि खड्डेमय असलेला मुंबई - गोवा महामार्ग जणू पाचवीलाच पुजलेला आहे. अशा परिस्थितीत रस्ते अथवा रेल्वे मार्गावरून जिल्ह्यात पोहचण्यासाठी १२ ते १४ तासांहून अधिक कालावधी लागत आहे. खाजगी बस सेवेचे दरही अवाच्या सवा वाढलेले आहेत. अशा परिस्थितीत वयोवृद्ध, आजारी, गरोदर स्त्रिया अशा प्रवाशांना विमानसेवा हा सोयीचा पर्याय उपलब्ध आहे. परंतु गगनाला भिडलेले विमान सेवेचे दर पाहून अनेक प्रवाशांनी विमान सेवेकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. चतुर्थी पूर्वी मुंबईहून चिपीला येणाऱ्या विमानसेवेचे दर १०००० रुपये तर पाच दिवसांच्या कालावधीनंतर मुंबईला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटाचे दर ९००० रुपयांच्या घरात पोचले आहेत.
प्लाय ९१ ची नियमित सेवा
एकीकडे सरकारी कंपनी असलेल्या अलायन्स एअरची चिपी - मुंबई सेवा अनियमित व चढ्या तिकीट दरांची ठरत असताना दुसरीकडे काही महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या गोवा स्थित फ्लाय ९१ या विमान कंपनीच्या बेंगलोर व हैदराबाद या सेवा मात्र अपवाद वगळता नियमित सुरू आहेत. वास्तविक जिल्ह्यातून या दोन्ही मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मर्यादित आहे. तरीही फ्लाय ९१ प्रवाशांना व्यवस्थित सेवा देत आहे. काही कारणास्तव चिपी येथील विमान फेरी रद्द झाल्यास तिकीट धारक प्रवाशांना मोपा विमानतळावरून प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येतो. या ठिकाणी विमान सेवेचे दरही अत्यंत माफक असे १८०० ते २००० रुपये ठेवण्यात आले आहेत.फ्लाय ९१ ने मुंबई -पुणे सेवा सुरु करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे