कबरीत मिळाला ‘चीनी सम्राट’
आपण शोधायला जातो एक, आणि अनपेक्षिरित्या मिळते भलतेच, असा अनेकांचा अनुभव आहे. अशीच काहीशी घटना चीनमध्ये घडली आहे. या देशात एका जुन्या कबरीचा शोध सुरु होता. ती 28 वर्षांपूर्वी मिळाली. या कबरीच्या परिसरात खोदकाम केले असता एक मोठा ऐतिहासिक ठेवाच हाती लागला.
ही कबर 1,400 वर्षांपूर्वीच्या एका चीनी सम्राटाची होती. ज्या काळात हा सम्राट चीनवर राज्य करीत होता, तो काळ चीनचे अंधारयुग म्हणून ओळखला जातो. या सम्राटाचे नाव वू असे होते आणि तो झोऊ वंशाचा होता. सध्याच्या चीनच्या उत्तर भागात त्याची सत्ता होती. चीनचा संपूर्ण उत्तर भाग एका छत्राखाली आणण्याचे काम त्याने केले होते, असे इतिहासात स्पष्ट करण्यात आले आहे.
त्याचीच कबर बऱ्याच शोधानंतर 28 वर्षांपूर्वी मिळाली. त्यानंतर तेथे व्यापक उत्खनन करण्यात आले. त्यात या सम्राटाचा सांगाडा हाती लागला. त्यातून एक सलग डीएनएचा नमुना काढण्यात यश आले आहे. आता या डीएनएच्या संचाचा अभ्यास करुन या सम्राटाचा चेहरा कसा असावा, याचे एक मॉडेल तयार करण्यात आले आहे. ही माहिती ‘करंट बॉयॉलॉजी’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जनुकीय संचातून या सम्राटाची इतरही माहिती हाती लागली आहे. तो जियानबेई नामक समूहाचा सम्राट होता, असे सिद्ध झाले आहे. या सम्राट वू च्या चेहऱ्यात संशोधकांना पूर्व आणि उत्तर चीनमधील मानवांच्या चेहऱ्यांचे गुणधर्म आढळले आहेत. त्यामुळे या सम्राटाची वंशावळ शोधणे शक्य झाले आहे. शांघाय येथील फुदान विद्यापीठात सध्या याचे अधिक संशोधन होत आहे. या सम्राटाच्या अचानक मृत्यूचे कारणही या जनुकीय संचावरुन निश्चित करण्यात यश येईल असा विश्वास या विद्यापीठाच्या संशोधकांनी व्यक्त केला आहे.