चिनी जोडप्याचा अनोखा विवाह
सोहळ्यात 200 हून अधिक श्वानांचा सहभाग
तुम्ही आजवर एकाहून एक भव्य विवाहसोहळे पाहिले असतील, ज्यात वधू-वर स्वत:च्या विवाहसोहळ्याला विशेष ठरविण्यासाठी काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात असतात. तुम्ही मॅरेज हॉलमध्ये विवाह किंवा डेस्टिनेशन वेडिंग पाहिले असेल. परंतु कधी श्वानांच्या निवारा केंद्रातील विवाह पाहिला आहे का? चीनमध्ये एका जोडप्याने असेच केले आहे. या वेडिंग व्हिडिओने सर्वांनाच चकित करून सोडले आहे.
जोडप्याने डॉग शेल्टरमध्ये विवाह केला आहे. या सोहळ्यात 200 हून अधिक श्वान अतिथी म्हणून सामील झाले होते. या श्वानांना या जोडप्यानेच वाचविले होते. यांग या इसमाने स्वत:चा व्यवसाय सोडून देत भटक्या श्वानांची मदत करण्याचा निर्णय घेतला होता. बालपणी मी माझ्या पाळीव पिल्लांना गमाविले होते. याच दु:खाने मला श्वानांची सेवा करण्यासाठी प्रोत्साहित केले. मी माझ्या बचतीतून एक डॉग शेल्टर सुरू केले, आता शेल्टरमध्ये 200 हून अधिक श्वान असल्याचे यांग यांनी सांगितले.
शेल्टरकरता यांग हळूहळू लोकांची मदत घेऊ लागले आणि अनेक स्वयंसेवक जोडले गेले. 2022 मध्ये 25 वर्षीय झाओ नावाची विद्यार्थिनी स्वयंसेवक म्हणून शेल्टरशी जोडली गेली. काही काळानंतर यांग आणि झाओ परस्परांना पसंत करू लागले आणि एकत्र शेल्टर चालवू लागले. तीन वर्षे एकत्र राहिल्यावर यांग आणि झाओने विवाह करण्याचा निर्णय घेतला. विवाहासाठी त्यांनी डॉग शेल्टरची निवड केली, कारण श्वानांना या खास दिनाचा हिस्सा होता येईल. लोकांनी आता याला ‘आतापर्यंतचा सर्वात प्रेमळ विवाह’ संबोधिले आहे.