चिनी बलूनचा हेरगिरीसाठीच वापर ः अमेरिका
अवशेषातून महत्त्वाचा सेंसर हस्तगत ः चीनने ऑस्ट्रेलियाला धमकाविले
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
5 फेब्रुवारी रोजी अमेरिकेने नष्ट केलेला चिनी बलूनकडून हेरगिरी करण्यात येत होती हे अखेर स्पष्ट झाले आहे. अमेरिकेने चिनी हेरगिरीची पुष्टी दिली आहे. बलूनचे अवशेष प्राप्त करण्यात आल्यावर त्याची तपासणी करण्यात आली. यात हा नागरी वापरासाठीचा नव्हे तर हेरगिरी करणारा बलून होता हे स्पष्ट झल्याचे अमेरिकेच्या सैन्याने म्हटले आहे.
दक्षिण कॅरोलिनाच्या सागरी क्षेत्रात मागील आठवडय़ात आम्ही चीनचा फुगा पाडविला होता. याच्या अवशेषांना नौदलाच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे. या अवशेषांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. या फुग्यामध्ये हाय डेफिनेशन सेंसर आणि कॅमेरे लावण्यात आले होते. तसेच आणखी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे हस्तगत झाली आहेत. यातील सेंसर्सचा वापर गोपनीय माहिती मिळविण्यासाठी करण्यात आला होता असे अमेरिकन सैन्याच्या उत्तर कमांडकडून सांगण्यात आले.
अमेरिका आणि येथील नागरिक पूर्णपणे सुरक्षित असल्याचा विश्वास देऊ इच्छितो. अमेरिकेचे सैन्य अशाप्रकारच्या कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्यास अत्यंत सक्षम असल्याचे उद्गार अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनी म्हटले आहे.
चीनने फेटाळला आरोप
चीनने अमेरिकेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अमेरिकेच्या वायुदलाने नष्ट केलेला फुगा हा नागरी वापरासाठीचा होता असे आम्ही पूर्वीच स्पष्ट केले आहे. अशाप्रकारच्या फुग्याद्वारे आम्ही हवामानाचा डाटा प्राप्त करतो. अमेरिकेचे प्रशासन या घटनेबद्दल अवाजवी प्रतिक्रिया देत आहे. कुठलाही बलून दुसऱया देशाच्या हवाईक्षेत्रात शिरणे सामान्य बाब आहे. 2022 पासून आतापर्यंत अमेरिकेचे 10 बलून्स चीनच्या हवाईक्षेत्रात दाखल झाल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाशी पत्करले शत्रुत्व
तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने स्वतःच्या सर्व शासकीय विभागांमधील चीनकडून निर्मित सीसीटीव्ही कॅमेरे हटविले आहेत. याप्रकरणी चीनने ऑस्ट्रेलियाला परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहा अशी धमकी दिली आहे. ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयाची आम्ही निंदा करतो. तेथील सरकार राष्ट्रीय सुरक्षेचे निमित्त समोर करत शासकीय शक्तीचा गैरवापर करत आहे. प्रत्यक्षात चिनी कंपन्यांना बदनाम करत त्यांना व्यवसायापासून रोखू पाहिले जातेय. चीन याप्रकरणी प्रत्युत्तर देणार असल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी म्हटले आहे.