चिनी राजदूताचे वक्तव्य, पाकिस्तानात गदारोळ
चिनी राजदूताकडून अवमान झाल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानने सुरक्षा मुद्द्यांवर चिनी राजदूत जियांग जैडोंग यांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. राजदूत जियांग यांचे वक्तव्य हे दोन्ही देशांमधील राजनयिक परंपरेला दर्शवित नसल्याचा दावा पाकिस्तानी विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज जहरा बलूच यांनी केला आहे. पाकिस्तानात चिनी नागरिकांवरील हल्ले पूर्णपणे अस्वीकारार्ह असल्याचे वक्तव्य जियांग यांनी केले होते.
चिनी नागरिकांवरील हल्ल्यांवरून चीनच्या चिंतेची जाणीव पाकिस्तानला आहे. पाकिस्तानी सरकारने हल्ल्यांच्या चौकशीशी निगडित दस्तऐवज चीनला उपलब्ध करून दिले आहेत. अशा स्थितीत चिनी राजदूताकडून आलेली प्रतिक्रिया आमच्यासाठी आश्चर्यजनक असल्याचे बलूच यांनी म्हटले आहे. पाकिस्तानातील अनेक नेते अणि राजकीय विश्लेषकांनी देखील चिनी राजदूताच्या टिप्पणीवर नाराजी व्यक्त करत याला देशाचा अपमान संबोधिले आहे.
चीनचे राजदूत जियांग जैडोंग यांनी कराचीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल वक्तव्य केले होते, या हल्ल्यात दोन चिनी नागरिक मारले गेले होते. केवळ 6 महिन्यांच्या आत दोन दहशतवादी हल्ले होणे अस्वीकारार्ह आहे. पाकिस्तान सरकारला सर्व चीनविरोधी दहशतवादी गटांच्या विरोधात कारवाई करण्याची गरज आहे. सुरक्षा हाच चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉरसाठी सर्वात मोठा अडथळा आहे. सुरक्षित वातावरणाशिवाय काहीच प्राप्त होणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते.
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे स्वत:च्या लोकांच्या सुरक्षेची पर्वा करतात. विशेषकरून पाकिस्तानातील चिनी नागरिकांच्या सुरक्षेची त्यांना काळजी आहे. चिनी नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करण्याचा आग्रह जिनपिंग हे पाकिस्तानी नेत्यांना करत असतात असा दावा चिनी राजदूताने केला आहे.