चीनचा रोबोट डॉग
चीनची कंपनी डीप रोबोटिक्सने एक नवा चार चाकं असणारा ऑल-टरेन रोबोट लिन्क्स तयार केला आहे. या रोबोटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेन्स सिस्टीम असून यामुळे हा रोबोट सर्वप्रकारच्या मार्गावर चालू शकतो. हा उडी घेत अॅथलिटप्रमाणे एरोबेटिक्सही करू शकतो.
या रोबोटला पर्वतीय भागातही वापरण्यात आले असून तेथे त्याने अनेक वृक्षांना पार केले आहे. 2 फूट उंच कोसळलेल्या झाडांवरूनही तो पलिकडे गेला आहे. तसेच 30 उंच दगडांची भिंतही त्याने ओलांडली आहे. याचबरोबर 50 डिग्रीयुक्त उतारावरही तो चालू शकला आहे.
लिंक्स रोबोट दोन्ही किंवा चारही पायांवर चालू शकतो. याची चारही चाकं मोठी असून ऑफरोडिंगसाठी तयार करण्यात आली आहेत. हा दोन पायांवर उडी घेऊ शकतो. माती आणि धूळयुक्त मार्गावर चालू शकतो. याचा वेग 18 किलोमीटर प्रतितास इतका आहे. हा 9 इंच उंचीपर्यंत उडी घेऊ शकतो. यात एचडी कॅमेरा बसविण्यात आला असून त्याद्वारे लाइव्ह स्ट्रीमिंग करता येते.
हा रिमोट इन्स्पेक्शन सारखे काम देखील करू शकतो. शत्रूच्या भागात गुपचूप जात तो टेहळणी करू शकतो. कुठल्याही आपत्तीच्या काळात लोकांना शोधणे आणि त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्यास याची मदत होणार आहे. डीप रोबोटिक्स एआयप्लस प्लॅटफॉर्मवर याची निर्मिती करण्यात आली असून यात मशीन लर्निंग सिस्टीम बसविण्यात आली आहे.
तीन तासांपर्यंत काम
या सिस्टीमद्वारे रोबोट कशाप्रकारे मॅन्युवर करायचे आहे हे समजून घेऊ शकतो. याची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर तीन तासापर्यंत काम करते. सातत्याने बॅटरी स्वॅपिंग होत राहिल्यास दीर्घकाळापर्यंत काम करू शकतो. सध्या हा रोबोट वॉटरफ्रूफ आणि डस्टप्रूफ नाही.
वेगवेगळ्या उद्देशांसाठी वापर
याचे पुढील मॉडेल वॉटरफ्रूफ अन् डस्टप्रूफ असणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वापर करता येतील अशाप्रकारे आणखी काही रोबोट्स तयार केले जातील असे डीप रोबोटिक्स कंपनीचे सांगणे आहे.