‘राफेल’ला बदनाम करण्याचा चीनचा डाव
फ्रान्सच्या गुप्तचर अहवालात दावा : लढाऊ विमानाबद्दल चीनकडून दुष्प्रचार
वृत्तसंस्था/ पॅरिस
चीन स्वत:च्या दूतावासांद्वारे फ्रान्सचे लढाऊ विमान राफेलविरोधात दुष्प्रचार करत आहे. फ्रेंच लढाऊ विमानांच्या क्षमतेवर संशय निर्माण करण्याचा प्रयत्न चीन करत आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या संघर्षानंतर या दुष्प्रचाराला वेग आला असल्याचे फ्रान्सच्या सैन्य आणि गुप्तचर यंत्रणांनी स्वत:च्या एका अहवालात म्हटले आहे. राफेल लढाऊ विमानांच्या तुलनेत स्वत:ची लढाऊ विमाने अधिक प्रभावी असल्याचा दावा चीन करत आहे.
चीनच्या दूतावासांमध्ये तैनात डिफेन्स अताशे विविध देशांना राफेल लढाऊ विमान खरेदी करू नये असे सांगत आहेत. खासकरून इंडोनेशियाचे मन वळविण्याचा प्रयत्न चीनकडून सुरू आहे. इंडोनेशियाकडून राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याचा विचार केला जातोय. चीन स्वत:च्या राफेल लढाऊ विमानांचा प्रचार करत असून विविध देशांवर ती खरेदी करण्यासाठी जोर टाकत आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मे महिन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष झाला होता, या संघर्षात क्षेपणास्त्रs अन् लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला होता. पाकिस्तानकडील चीननिर्मित शस्त्रास्त्रs खासकरून लढाऊ विमानांनी भारताकडे असलेल्या फ्रेंचनिर्मित राफेल लढाऊ विमानांनी कशाप्रकारे कामगिरी केली हे जाणून घेण्यासाठी सैन्यतज्ञ प्रयत्नशील आहेत. भारताची 5 लढाऊ विमाने पाडविली, ज्यात 3 राफेल सामील असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. तर फ्रान्सचे वायुदलप्रमुख जनरल जेरोम बेलेंजर यांनी भारताने बहुधा 3 लढाऊ विमाने गमाविली असून यात एक राफेल, एक सुखोई आणि एक मिराज 200 सामील असल्याचे म्हटले आहे.
फ्रान्सच्या संरक्षण निर्यातीत राफेल महत्त्वपूर्ण
फ्रान्सकडून अनेक देशांना राफेल विमाने पुरविण्यात आली आहेत, तर पहिल्यांदाच राफेलला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. लढाऊ विमान जर पडले असेल तर संबंधित देश याबद्दल सांगू शकतो असे बेलेंजर यांनी नमूद केले आहे. फ्रान्सच्या शस्त्रास्त्रनिर्यातीत मोठा हिस्सा राफेल आणि त्याच्याशी निगडित उपकरणांचा आहे. विविध देशांसोबत संबंध सुधारण्यासाठी फ्रान्सचे हे प्रमुख साधन देखील आहे. परंतु सध्या फ्रान्सला चीनच्या दुष्प्रचाराला तोंड द्यावे लागत असून यात पाकिस्तान आणि चीन दोन्ही सामील आहेत.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात दुष्प्रचार
चीनच्या यंत्रणांकडून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केले जात असून यात बनावट छायाचित्रांद्वारे राफेलचे अवशेष दाखविले जा आहेत. तसेच एआय जनरेट कंटेंट आणि व्हिडिओ गेमची क्लिप दाखवून राफेलला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षानंतर 1 हजाराहून अधिक सोशल मीडिया अकौंट तयार करण्यात आली आणि त्यांच्या माध्यमातून चीनचे सैन्यतंत्रज्ञान अधिक प्रभावी असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे.