एआयच्या जगतात चीनची कमाल
एआय आणि रोबोटिक्सच्या तंत्रज्ञानात दररोज नवा विस्तार दिसून येत आहे. एआयवर जगातील अनेक देशांमध्ये संशोधन होत आहे, तर याच मदतीने चीन एकाहून एक नवे विक्रम नोंदवत आहे. चीनमध्ये पहिल्यांदाच जगातील कुठल्याही एआय रोबोटला पीएचडीत प्रवेश मिळाला आहे. या रोबोटचे नाव शीयुबा 01 असून तो चार वर्षांचा पीएचडी प्रोग्राम करणार अहे.
चीनच्या शीयुबा नावाच्या एआय रोबोटला चार वर्षांच्या पीएचडी कार्यक्रमात प्रवेश मिळाला आहे. शीयुबा नावाच्या या रोबोटला वर्ल्ड आर्टिफिशियल इंटेलिजेन्स कॉन्फरन्सदरम्यान डॉक्टरेट करण्यासाठी निवडण्यात आले. हा रोबोट पुढील 4 वर्षांसाठी शांघाय थिएटर अकॅडमीत पीएचडी करणार आहे.
या रोबोटच्या निर्मितीत शांघाय युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अणि ड्रॉइडअप रोबोटिक्सची खास भूमिका राहिली आहे. शीयुबा चिनी ओपेरावर संशोधन करणार असल्याचे समजते. हा एक ह्यूमनॉइड रोबोट असून तो माणसांप्रमाणे दिसतो. याची त्वचा सिलिकॉनने निर्मित आहे. याचबरोबर या रोबोटच्या चेहऱ्यात माणसांसारखे भाव दिसून येतात. या रोबोटचे वजन 30 किलोग्रॅमच्या आसपास आहे. तर याची लांबी सुमारे 1.75 मीटर आहे. सप्टेंबर महिन्यात हा रोबोट अधिकृतपणे पीएचडीत प्रवेश घेणार आहे.