चीनच्या ‘ब्युटीफुल गव्हर्नर’ला 13 वर्षांची शिक्षा
58 सह-कर्मचाऱ्यांचे केले शोषण : 71 कोटीची घेतली लाच
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनमध्ये ‘ब्युटीफुल गव्हर्नर’ या नावाने प्रसिद्ध ग्वाइझू प्रांताची गव्हर्नर झोंग यांगला 13 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच तिच्यावर 1 कोटी 16 लाखाचा दंडही ठोठावण्यात आला. 52 वर्षीय झोंग यांगला सुमारे 71 कोटी रुपयांची लाच स्वीकारणे आणि 58 सह-कर्मचाऱ्यांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे.
झोंग या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ग्वाइजूच्या डेप्युटी सेक्रेटरी आणि गव्हर्नर राहिल्या आहेत. झेंग यांनी वयाच्या 22 व्या वर्षी पक्षात प्रवेश केला होता. जानेवारी 2023 मध्ये चीनच्या ग्वाइझू रेडियोने स्वत:च्या अहवालात झोंगशी निगडित वादांचा उल्लेख केला होता.
झोंग यांनी पदाचा वापर करत शासकीय गुंतवणुकीच्या नावाखाली स्वत:च्या पसंतीच्या कंपन्यांना मोठी कंत्राटं मिळवून दिल्याचा आरोप आहे. एकाप्रकरणी झोंग यांनी एका उद्योजकाला 1.7 लाख चौरस मीटरच्या भूखंडात हाय-टेक इंडस्ट्रियल युनिट स्थापन करण्याचे कंत्राट मिळवून दिले होते. या उद्योजकासोबत झोंग यांचे निकटचे संबंध होते.
या कंत्राटामुळे झोंग यांनाही मोठा लाभ झाला होता. वैयक्तिक संबंध्घ् असलेल्या कंपन्यांनाच झोंग मदत करत होत्या. एप्रिल 2023 मध्ये ग्वाइझू प्रांताच्या पर्यवेक्षण समितीने झोंग विरोधात चौकशीची घोषणा केली होती. यादरम्यान झेंग यांच्यावर 58 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचाही आरोप झाला.
2023 मध्ये झाली अटक
शारीरिक संबंध ठेवलेल्या लोकांना झोंगने व्यवसायात लाभ मिळवून दिला होता. तर इतर लोकांमध्ये झोंग यांच्यासोबत काम करणारे लोक सामील होते. झोंग बिझनेस ट्रिप किंवा ओव्हरटाइमच्या निमित्ताने या लोकांना भेटत होत्या. झोंग यांना मागील वर्षी एप्रिलमध्ये अटक करण्यात आली होती. झोंग यांना कम्युनिस्ट पक्ष आणि नॅशनल पीपल्स काँग्रेसमधून हाकलण्यात आले आहे.
कृत्याबद्दल पश्चाताप
माझ्या कृत्याबद्दल मला पश्चाताप आहे. मी स्वत:सोबत काम केलेले लोक, परिवार आणि राजकीय नेत्यांच्या नजरेला नजर भिडवू शकत नसल्याचे झोंग यांनी स्वत:वर निर्मित एका माहितीपटात नमूद केले होते. माझे आईवडिल मला कामात प्रामाणिक राहण्याचा सल्ला द्यायचे, परंतु मी त्यांचा सल्ला मानला नसल्याचेही त्यांनी म्हटले हेते.