अमेरिकेच्या प्रभावक्षेत्रात चीनची धडक
पेरूमध्ये विशाल बंदराची निर्मिती : ट्रम्प यांच्यासमोर ड्रॅगनचे मोठे आव्हान
वृत्तसंस्था/ लीमा
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष होण्यापूर्वी चीनने मोठे पाऊल उचलले आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी अमेरिकेच्या शेजारी दक्षिण अमेरिका खंडात एका अत्यंत विशाल बंदराचे उद्घाटन केले आहे. हे बंदर दक्षिण अमेरिकन देश पेरू या देशात निर्माण करण्यात आले आहे. पेरू हा देश अमेरिकेचा अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखला जायचा, परंतु आता पेरू हा देश अमेरिकेच्या प्रभावातून बाहेर पडत असल्याचे मानले जात आहे. अमेरिकेच्या अत्यंत नजीक विशाल बंदर निर्माण करण्याचा हा प्रकार म्हणजे चीनचे निर्णायक पाऊल असल्याचे विश्लेषकांचे सांगणे आहे.
आगामी काळात या बंदरावर चीनचे नौदलही पोहोचू शकते अशी भीती व्यक्त होत आहे. तसेच या बंदराच्या माध्यमातून अमेरिकेच्या नौदलाची हेरगिरी होण्याची शक्यता आहे. चीनकडून या निर्मित या बंदराचे नाव चानकाय असून हे प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर साकारण्यात आले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चीनमध्ये निर्मित उत्पादनांवर 60 टक्के आयातशुल्क लादणार असल्याची घोषणा केली होती. आता अमेरिकेच्या प्रभावक्षेत्रात चीनने मोठे बंदर उभारत जागतिक महासत्तेला थेट आव्हान दिले आहे. या नव्या बंदराद्वारे चीन पूर्ण उत्तर अमेरिकेला वगळून नवा व्यापारी मार्ग साधणार आहे. यामुळे चीनला अमेरिकेच्या बंदरांचा वापर करावा लागणार नाही. या बंदराचे उद्घाटन चीनच्या अध्यक्षांनी स्वत: केले आहे, यातूनच या बंदराचे महत्त्व समजून घेतले जाऊ शकते. क्षी जिनपिंग हे पेरू या देशात एपेकच्या बैठकीत भाग घेण्यासाठी पोहोचले होते.
एपेकच्या बैठकीऐवजी जागतिक समुदायाची नजर या बंदरावर होती. चीन अत्यंत आक्रमकतेने वाटचाल करत असून अमेरिकेच्या प्रभावक्षेत्रात मुसंडी मारत असल्याचा पुरावा म्हणजे हा बंदर आहे. अमेरिकेने स्वत:च्या शेजाऱ्यांना अनेक वर्षांपासून चांगली वागणूक दिलेली नाही, याची किंमत आता अमेरिकेला मोजावी लागत असल्याचे विश्लेषकांचे सांगणे आहे. अमेरिकेने दक्षिण अमेरिकेतील देशांना मदत करणे टाळले होते. या संधीचा लाभ चीनने उचलत दक्षिण अमेरिकन देशांवर अत्यंत वेगाने स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे.
दक्षिण अमेरिकन देशांशी थेट संपर्क
अमेरिकेचे शेजारी देश आता थेट चीनसोबत चर्चा करत असून त्याच्यासोबत करार करत आहेत. तर नव्या बंदरामुळे पेरूने तैवानपासून अंतर राखण्यास सुरुवात केली आहे. तैवानवर चीन स्वत:चा दावा सांगत आहे, तर अमेरिकेने तैवानचे चीनपासून रक्षण करण्याचे उत्तरदायित्व स्वीकारले आहे. चीनची मर्जी राखण्यासाठी पेरू या देशाने आता तैवानसोबतचे संबंध कमी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. तर दुसरीकडे संबंधित बंदर चीनची सरकारी कंपनी कोस्कोने विकसित केले आहे. हे बंदर आता पेरूच्या पूर्ण अर्थव्यवस्थेला बदलू शकते. यामुळे आता दक्षिण अमेरिकेतील अनेक देश म्हणजेच चिली, इक्वेडोर, कोलंबिया आणि ब्राझील देखील थेट चीन आणि आशियातील अन्य देशांशी जोडले गेले ओहत. चीन आता स्वत:ची विशाल आकाराची जहाजं या बंदरावर पाठवू शकेल आणि कमी कालावधीत सामग्रीचा पुरवठा तसेच आयात करू शकणार आहे.