For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताशी शांतता कराराला चीनचा दुजोरा

06:48 AM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताशी शांतता कराराला चीनचा दुजोरा
Advertisement

करारामुळे सीमासंघर्ष संपुष्टात येण्याची चिन्हे : भारत सावधानता बाळगणारच

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली, बिजींग

लडाख सीमेवर 2020 ची स्थिती निर्माण करण्यासंबंधी भारत आणि चीन यांच्यात करार झाला आहे. या करारावर प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त करताना चीनच्या वरिष्ठ नेतृत्वाने समाधान व्यक्त केले असून कराराला दुजोरा दिला आहे. लडाख सीमेवरच्या अनेक स्थानी गेली चार वर्षे भारत आणि चीनच्या सेना एकमेकींसमोर उभ्या आहेत. याच विवादातून गलवान संघर्ष निर्माण झाला होता. या करारामुळे आता दोन्ही देशांच्या सेना 2020 च्या स्थितीत आणल्या जातील, अशी शक्यता आहे. कराराचे प्रत्यक्ष क्रियान्वयन होईपर्यंत भारत सावध राहणार असल्याचे प्रतिपादन भारताच्या भूसेना प्रमुखांनी मंगळवारी केले आहे.

Advertisement

लडाखच्या संघर्षावर तोडगा काढण्यात यश आले आहे, अशी प्रतिक्रिया चीनच्या विदेश व्यवहार विभागाचे प्रमुख प्रवक्ते लिन जिआन यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत मंगळवारी व्यक्त केली. भारताशी असा करार झाला आहे, या वृत्ताला आम्ही सकारात्मक दुजोरा देत आहोत, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले आहे.

तोडग्याचे महत्त्व

गेल्या चार वर्षांपासून पूर्व लडाखच्या भारत-चीन सीमेवर चार महत्त्वाच्या स्थानी दोन्ही देशांच्या सेनांमध्ये संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांच्या सेना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळ आल्या असून एकमेकींच्या डोळ्याला डोळा भिडवून उभ्या आहेत. 2020 मध्ये दोन्ही सेना एकमेकींपासून बऱ्याच अंतरावर उभ्या होत्या. आपल्या स्थानापासून विशिष्ट अंतरापर्यंत गस्त घालण्याचा अधिकार दोन्ही सेनांना होता. 2020 च्या मार्च महिन्यात अचानक चिनी सेनेने पुढे येण्यास प्रारंभ केला. चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांना विशिष्ट स्थानापर्यंत गस्त घालण्यास अटकाव केला. त्यामुळे भारतानेही आपली सेना तिच्या मूळ स्थानापासून पुढे आणून चीनची पुढे येण्याची चाल रोखली. यातूनच गलवान येथे दोन्ही सेना एकमेकींना भिडल्याने आणि त्यांच्यात संघर्ष झाल्याने भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते. तसेच चीनचेही अनेक सैनिक मारले गेले होते.

संघर्ष प्रदीर्घकाळ

तेव्हापासून दोन्ही देशांच्या सैन्याच्या अनेक तुकड्या लडाख सीमेवर चार स्थानी एकमेकींच्या समोर आहेत. त्यांनी 2020 च्या स्थितीत जावे, यासाठी अनेकदा दोन्ही सेनांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा केली आहे. तथापि, तोडगा निघत नव्हता. गेल्या आठवड्यात हा तोडगा काढण्यात यश आले असून तसा करार दोन्ही देशांच्या सेनांमध्ये झाला आहे. आता चीननेही या कराराला दुजोरा दिल्याने सीमेवरील संघर्ष निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या करारानुसार दोन्ही देशांच्या सेना 2020 च्या स्थितीत जाणार असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याचा अधिकार त्यांना या करारानुसार पूर्वीप्रमाणे मिळणार आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये दोन्ही देशांनी सीमेवरील आपल्या सैनिक तुकड्यांच्या संख्येत मोठी वाढ केली आहे. मात्र गलवान वगळता अन्यत्र प्रत्यक्ष संघर्ष झालेला नाही.

भारताची सावध भूमिका

भारतीय सेनेने या करारावर समाधान व्यक्त केले असून त्याचे क्रियान्वयन त्वरित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तथापि, करार प्रत्यक्ष लागू होईपर्यंत भारताची सेना सावध राहणार आहे, असे भूसेना प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर हा करार झाला असून दोन्ही सेनांकडून त्याचे लवकरात लवकर क्रियान्वयन केले जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. असा करार होणे ही सकारात्मक बाब असली, तरी सावध राहणे हे भारतीय सेनेचे कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. या कराराचे क्रियान्वयन झाल्यानंतर दोन्ही देशांमधील सैनिक आणि राजनैतिक तणाव निवळणार आहे.

कोणत्या स्थानांवर संघर्ष...

भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाख सीमेवर गलवान, हॉट स्प्रिंग्ज, गोग्रा आणि पॅनगाँग येथे संघर्ष उद्भवला होता. या चार स्थानांपैकी गलवान आणि हॉट स्प्रिंग्ज येथे जून-जुलै 2020 मध्ये अंशत: तोडगा काढण्यात आला होता. तसेच पॅनगाँग सरोवर परिसरात फेब्रुवारी 2021 मध्ये तोडगा काढण्यात आला होता. मात्र, सध्याच्या करारानुसार 2020 ची स्थिती पुन्हा आणली जाणार आहे.

शांतता निर्माण होण्याची संधी

ड भारत-चीन करारामुळे लडाख सीमेवर संघर्ष मिटण्याची शक्यता

ड दोन्ही देशांच्या सेना 2020 च्या स्थितीत जाण्याची यात तरतूद

ड तोडगा निघाल्यामुळे दोन्ही देशांच्या सेनांकडून समाधानाची भावना

ड तोडग्याचे क्रियान्वयन लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न सुरु

Advertisement
Tags :

.