राफेल विरोधात चीन-पाकचा दुष्प्रचार
अमेरिकेच्या अहवालातून झाले उघड : स्वत:चे ‘जे-35’ विकण्यासाठी चीनची धडपड
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेच्या नव्या गुप्तचर अहवालातून मोठा खुलासा झाला आहे. मे महिन्यात भारताने पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर राबविले होते. त्याकाळात चीनने फ्रान्सच्या राफेल लढाऊ विमानांची विक्री रोखण्यासाठी असत्याचे जाळे विणले होते. चीन स्वत:चे नवे लढाऊ विमान जे-35 विकण्यासाठी प्रेंच लढाऊ विमानाच्या विरोधात दुष्प्रचार करत होता. चीन आणि पाकिस्तानने मिळून भारतीय राफेल विरोधात दुष्प्रचाराची मोहीम उघडली होती.
भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या संघर्षाचा लाभ चीन स्वत:च्या शसास्त्रांच्या विक्रीसाठी घेऊ पाहत होता. पाश्चिमात्य शस्त्रास्त्रांपेक्षा स्वत:चे जे-35 वरचढ असल्याचा दावा चीन करत होता. भारत-पाकिस्तान संघर्षाचा वापर चनीने स्वत:च्या शस्त्रास्त्रांच्या विक्रीसाठी युद्धमैदानाप्रमाणे केला असल्याचा दावा अमेरिकन संसदीय आयोगाच्या नव्या अहवालात करण्यात आला आहे. चीनने भारत-पाकिस्तान संघर्षाला एका ‘संधी’प्रमाणे पाहिल्याचे युएस-चायना इकोनॉमिक अँड सिक्युरिटी रिह्यू कमिशनने स्वत:च्या वार्षिक अहवालात म्हटले आहे.
सत्य काय होते?
भारताची सर्व लढाऊ विमाने सुरक्षित असल्याचे भारतीय वायुदलाने स्पष्ट केले होते. केवळ तीन जुन्या मिग-21 विमानांचे नुकसान झाले होते. तर राफेल विमानावर ओरखडाही उमटला नव्हता, तरीही चीनचा दुष्प्रचार अनेक महिन्यांपर्यंत सुरूच राहिला.
भारतातील काही जण दुष्प्रचाराचे बळी
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतातील काही घटक किती राफेल विमाने पडली, अशी विचारणा करत होते. तर वायुदलाने युद्धावेळी मोहिमात्मक माहिती देणे देशाच्या सुरक्षेला धोक्यात आणू शकते, असे स्पष्ट केले होते. अमेरिकेच्या अहवालात चीनने बाहेरून दुष्प्रचाराचे अभियान राबविले, परंतु भारतात काही लोक चीनचाच आवाज ठरल्याचा उल्लेख आहे.
ग्रे झोन म्हणजे काय?
ग्रे झोनचा अर्थ न युद्ध, न शांतता, अत्यंत मध्यम मार्ग. गोळी न चालविणे, युद्धाची घोषणाही न करणे, परंतु दुसऱ्या देशाला नुकसान पोहोचविले जाते. असत्य, दबाव, सायबर हल्ले, आर्थिक धमकीचा याकरता वापर केला जातो. अमेरिकेचा हा अहवाल सद्यकाळातील लढाई केवळ सीमेवर नव्हेतर आमच्या फोनच्या स्क्रीनवरही होत असल्याचे सांगतो. जे लोक कुठलाही विचार न करता बनावट छायाचित्रे आणि अफवा फैलावतात, ते अजाणतेपणी इतर देशाचे अस्त्र ठरत असतात.
हे पहिल्यांदा घडले नाही...
अमेरिकेच्या अहवालात चिनी ग्रे झोन कारवायांची पूर्ण यादी आहे, यातील काही उदाहरणे...
- फिलिपाईन्सच्या मच्छिमारांना पिटाळून लावणे
- दक्षिण चीन समुद्रात जहाजांना घाबरविणे-धमकाविणे
- आफ्रिकन देशांमधून महत्त्वपूर्ण खनिजे खरेदी करू न देणे
- फॉक्सकॉन कंपनीवर गुंतवणूक करण्याचा दबाव टाकणे
- तैवानच्या निवडणुकीपूर्वी चिनी सामग्रीची तपासणी सुरू करणे
- अंतराळात इतर देशांचे उपग्रह खराब करण्याचा प्रयत्न
अहवालानुसार चीनने काय केले?
- हजारो बनावट सोशल मीडिया अकौंट्स तयार करण्यात आली
- एआयच्या मदतीने बनावट छायाचित्रे तयार करत संघर्षात राफेल विमानांचे तुकडे झाल्याचा देखावा निर्माण करण्यात आला
- ही बनावट छायाचित्रे व्हायरल करत राफेल लढाऊ विमान कमकुवत असल्याचा आणि पाकिस्तानने चिनी शस्त्रास्त्रांच्या मदतीने ते पाडविल्याचा खोटा संदेश प्रसारित केला
- चिनी शस्त्रास्त्रांनी फ्रेंच राफेलला नमविल्याचा खोटा दावा करत चिनी दूतावासांनी याला सेलिंग पॉइंटचे स्वरुप दिले