For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘सेला’ बोगद्यामुळे चीनला धडकी

06:45 AM Mar 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘सेला’ बोगद्यामुळे चीनला धडकी
Advertisement

जगातील सर्वात लांब दुहेरी भुयारी मार्ग, भारतीय सैन्यासाठी मोठा लाभ

Advertisement

वृत्तसंस्था/ इटानगर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, 9 मार्च रोजी सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या सेला बोगद्याचे उद्घाटन केले. चीनच्या सीमेवर अरुणाचल प्रदेशातील तवांग आणि कामेंग भागात कोणत्याही ऋतूमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि जलद सैन्य तैनात करणे सुलभ करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. हा बोगदा आसामच्या मैदानी भागात 4 कॉर्प्स हेडक्वार्टरपासून तवांगपर्यंत तोफखान्यांसह सैन्य आणि अवजड शस्त्रे जलदगतीने तैनात करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. भारत आणि चीनदरम्यानच्या सीमेपर्यंतच्या हालचालींसाठी या भुयारी मार्गाचा मोठा लाभ होणार असल्याने त्याच्या निर्मितीमुळे चीनला धडकी भरली आहे. नवीन ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत वापरून याची निर्मिती करण्यात आल्याने भक्कमता सर्वाधिक आहे.

Advertisement

‘सेला’ बोगद्याची पायाभरणी पंतप्रधान मोदींनी फेब्रुवारी 2019 मध्ये केली होती. 3,488 किमी लांबीच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर चीनसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान त्याची निर्मिती झाली झाले. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (बीआरओ) ‘सेला’ बोगद्याचे वर्णन भारतातील सर्वात आव्हानात्मक पायाभूत सुविधांच्या प्रयत्नांपैकी एक म्हणून केला आहे. ‘सेला’ हा सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा बोगदा 13,000 फूट उंचीवर बांधलेला सर्वात लांब बोगदा आहे. हा दुहेरी बोगदा अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामिंग आणि तवांग जिह्यांना जोडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सर्वोच्च उंचीवर बांधलेला जगातील सर्वात लांब ‘सेला’ बोगदा देशाला समर्पित केला. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी आसाम आणि अरुणाचललाही कोट्यावधींच्या विकासकामांचे उद्घाटन केले. यादरम्यान ‘...आज मला सर्व ईशान्येकडील राज्यांसह विकसित ईशान्येच्या या उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली’ असे उद्गार काढत तुमचे स्वप्न हे आपले संकल्प असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात काढले.

आज येथे 55 हजार कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन किंवा पायाभरणी झाली आहे. आज अऊणाचल प्रदेशातील 35 हजार गरीब कुटुंबांना त्यांची कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत. अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरामधील हजारो कुटुंबांना नळ जोडणी मिळाली आहे, ईशान्येकडील वेगवेगळ्या राज्यांमध्ये कनेक्टिव्हिटीशी संबंधित अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन होत आहे. ईशान्य भारताच्या विकासाच्यादृष्टीने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ईशान्येकडील राज्यांचा विचार करून आमच्या सरकारने विशेषत: ‘मिशन पाम ऑईल’ सुरू केले आहे. या अभियानांतर्गत आज पहिल्या ऑईल मिलचे उद्घाटन करण्यात आले. या मिशनमुळे भारत केवळ खाद्यतेलाच्या बाबतीत स्वावलंबी होणार नाही तर येथील शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

नवा भुयारी मार्ग एलएसीच्या जवळ असल्यामुळे हा बोगदा धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. बलिपारा-चरिद्वार-तवांग हा रस्ता बर्फवृष्टी, अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे वर्षभर बराच काळ बंद राहिल्याने सेला खिंडीजवळ असलेल्या बोगद्याची खूप गरज होती. या प्रकल्पात दोन बोगद्यांचा समावेश आहे. 13,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर बांधण्यात आलेला हा सर्वात लांब बोगद्यांपैकी एक आहे.

सेला बोगद्याची वैशिष्ट्यो...

► सेला बोगदा हा जगातील सर्वात लांब दुहेरी मार्गाचा बोगदा आहे. तो बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने 825 कोटी ऊपये खर्चून 13,000 फूट उंचीवर बांधला आहे.

► सेला बोगद्यामध्ये अनुक्रमे 1,595 मीटर आणि 1,003 मीटर लांबीचे दोन बोगदे आहेत. तसेच 8.6 किलोमीटरचे जोड रस्ते असून टी1 आणि टी2 अशा दोन ट्यूब (नळ्या) आहेत.

► 3,000 कार आणि 2,000 ट्रकच्या दैनंदिन प्रवासाला सामावून घेण्याची क्षमता असलेला हा मार्ग लोकांची सुरक्षितता, वायुवीजन प्रणाली, मजबूत प्रकाश आणि अग्निशामक यंत्रणांनी सुसज्ज आहे.

► सर्व लष्करी वाहने सामावून घेण्याची क्षमताही या भुयारी मार्गात आहे. साहजिकच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला त्वरित प्रतिसाद मिळू शकेल.

► भक्कम मार्गिकेमुळे आसामच्या मैदानी भागात 4 कॉर्प्स मुख्यालयापासून तवांगपर्यंत तोफखाना गनसह सैन्य आणि अवजड शस्त्रे जलद तैनात करणे सुनिश्चित होते.

► हा बोगदा अऊणाचलच्या पश्चिम कामेंग जिल्ह्यातील तवांग आणि दिरांगमधील अंतर 12 किमीने कमी करेल. परिणामी प्रवाशांचा सुमारे 90 मिनिटांचा वेळ वाचेल.

► हिवाळ्यात सेला पास येथे हिमवृष्टीमुळे अनेकदा अडथळे येतात, ज्यामुळे लष्करी आणि नागरी वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण अडथळे निर्माण होतात. हा धोका आता टळणार आहे.

Advertisement
Tags :

.