चीनची भारतात ड्रोनद्वारे हेरगिरी
वृत्तसंस्था / शिमला
चीन भारतात ड्रोनच्या साहाय्याने हेरगिरी करीत आहे, असा गंभीर आरोप हिमाचल प्रदेशचे वनवासी विकास आणि महसूल मंत्री जगतसिंग नेगी यांनी केला आहे. सर्वसाधारणपणे असे आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून केले जातात. तथापि, हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या मंत्र्याने असा आरोप केल्याने तो महत्वाचा मानला जात आहे. हिमाचल प्रदेशातील अनेक भागांवर आकाशात अनेकदा चीनची ड्रोन विमाने दिसून येतात, असे नेगी यांचे म्हणणे आहे.
हिमाचल प्रदेशचा काही सीमावर्ती भाग चीनच्या सीमेनजीक आहे. या भागात असे ड्रोन नेहमी दिसून येतात. चीन या ड्रोनचा उपयोग करुन भारतातील हालचालींचे निरीक्षण करत आहे. हिमाचल प्रदेश आणि चीनच्या सीमेवर भारतीय सेनेच्या तुकड्या गस्त घालत असतात. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी चीन ड्रोनचा उपयोग करीत आहे, असा इशारा अनेक तज्ञांनीही दिला आहे.
हेरगिरी रोखणे आवश्यक
चीनकडून होणारी ही हेरगिरी रोखणे आवश्यक आहे. केवळ भारत माता की जय अशा घोषणा देणे पुरेसे नाही. चीन भारताच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न करीत आहे. तो प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता आहे. चीन अत्यंत चलाख असून तो सातत्याने भारताच्या कुरापती सीमावर्ती भागांमध्ये काढत आहे. भारताने नेहमीच डोळ्यात तेल घालून सीमेची सुरक्षा करणे आवश्यक आहे. तरच चीनचे कुटील डावपेच उधळता येतील, असे नेगी यांनी वक्तव्यात स्पष्ट केले आहे.
यापूर्वीही दिला होता इशारा
नेगी यांनी चीनच्या आक्रमक आणि घुसखोर प्रवृत्तीसंबंधी यापूर्वीही इशारा दिला होता. हिमाचल प्रदेशच्या स्फिती आणि लाहौल भागांमध्ये चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला आहे. मात्र, केंद्र सरकारने या विरोधात कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. सातत्याने चीनचा ध्वज भारताच्या दिशेने पुढे पुढे येत आहे. त्वरित कारवाई करुन त्याला रोखणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.