4×100 मीटर मेडले रिलेमध्ये चीन, अमेरिका अव्वल
वृत्तसंस्था/ पॅरिस
चीनने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 4×100 मीटर मेडले रिले जलतरणाच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक मिळवले, तर अमेरिकेने महिलांच्या गटात अव्वल स्थान पटकावले. पुऊषांच्या गटात चीनने 3:27.46 या वेळेसह स्पर्धेतील सुवर्णपदक पटकावले. दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या अमेरिकेच्या चमूने 3:28.01 या वेळेसह रौप्य, तर फ्रान्सने 3:28.38 च्या वेळेसह कांस्यपदक पटकावले.
महिलांच्या 4×100 मीटर मेडले रिले फायनलमध्ये मात्र अमेरिकेने 3:49.63 च्या वेळेसह अव्वल स्थान पटकावले आणि ग्वांगजू येथे 2019 मध्ये नोंदविलेला 3:50.40 वेळेचा स्वत:चा विश्वविक्रम मोडला. दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया 3:53.11 च्या वेळेसह राहिला आणि त्यांना रौप्य पदक मिळाले. तर 3:53.23 च्या वेळेसह कांस्यपदक चीनला प्राप्त झाले.
मात्र, जलतरणात भारताची ऑलिम्पिकमध्ये मोहीम चांगली झाली नाही. श्रीहरी नटराज आणि धिनिधी देसिंघू यांना आपापल्या गटात प्राथमिक फेरीच्या पुढे प्रगती करता आली नाही. 14 वर्षांची देसिंघू ही भारतीय पथकातील सर्वांत युवा खेळाडू असून महिलांच्या 200 मीटर फ्रीस्टाईलमध्ये तिने 2 मिनिटे 6.96 सेकंदांची वेळ नोंदविली. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या मॉली ओ कलघनने 1:55.79 च्या वेळेसह सुवर्ण प्राप्त केले. दुसरीकडे, श्रीहरी नटराजने पुऊषांच्या 100 मीटर बॅकस्ट्रोकच्या प्राथमिक फेरी-2 मध्ये 55.01 ची वेळ नोंदवून दुसरे स्थान पटकावले, परंतु त्याच्या वेळेनुसार त्याला 46 जलतरणपटूंच्या गटात एकंदरित 33वे स्थान मिळाले.