चिमासाहेब महाराज,आम्हाला माफ करा !
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
1857 चा काळ म्हणजे ब्रिटीश सत्तेच्या विरोधात साचलेल्या संतापाचा उद्वेsग व्यक्त झालेला काळ. देशात ठिकठिकाणी कमी अधिक प्रमाणात उद्रेक होतच होता. कोल्हापूरही त्याला अपवाद नव्हते. कोल्हापुरातही 1857 साली उठाव झाला. नेटिव्ह सैनिकांनी म्हणजे स्थानिक सैनिकांनी ब्रिटिश रेसिडेन्सीवर हल्ला केला. आत्ताचे ताराबाई पार्क, डीएसपी ऑफिस, कलेक्टर निवासस्थानाचा परिसर म्हणजे त्यावेळची रेसिडेन्सी. हल्ल्याला त्याक्षणी तोंड देता न आल्याने काही ब्रिटीश अधिकारी कुटुंबासह पळाले. दुसऱ्या एका उठावाच्या प्रसंगात फिरंगोजी शिंदे या गिरगावच्या (ता. करवीर) तरुणाच्या नेतृत्वाखाली जुना राजवाड्याच्या परिसरात मोठा उठाव झाला. राजवाड्यात सशस्त्र घुसण्याचा प्रयत्न झाला. पण हा उठाव पूर्ण ताकतीने यशस्वी झाला नाही. फिरंगोजी शिंदे व त्याच्या सहकाऱ्यांचा राजवाड्याच्या आवारात बळी गेला. चौकशी समिती नेमली गेली व त्यानंतर कोल्हापूरच्या इतिहासात खूप मोठी एक घटना घडली.
या उठावामागे कोल्हापूरचे चिमासाहेब महाराज यांचाच हात होता. किंवा त्यांचीच क्रांतिकारकांना फुस होती, असा निष्कर्ष चौकशी करणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्याने काढला व तेवढ्यावर न थांबता म्हणजे क्रांतिकारकांना पुन्हा बळ मिळू नये म्हणून चिमासाहेब महाराजांवर एका टोकाच्या कारवाईचा निर्णय झाला. आपल्या चिमासाहेब महाराजांना एक दिवस ब्रिटिशांनी जुन्या राजवाड्यातून ताब्यात घेतले, व त्यांना कोल्हापुरातून विजयदुर्गला व तेथून कराचीला बोटीतून नेऊन स्थानबद्ध करण्यात आले. आपला हा क्रांतिकारक राजा अखेरपर्यंत ब्रिटिशांच्या स्थानबद्धतेत राहिला. कराचीतच त्यांच्या स्थानबद्धतेत मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीलाही त्यांचे अखेरचे दर्शन मिळू शकले नाही, असा हा आपला कोल्हापूरचा क्रांतिकारी राजा स्वातंत्र्याच्या इतिहासात अजरामर ठरला.
पण आज ‘चिमासाहेब महाराज, आम्हाला माफ करा’ असे म्हणायची वेळ आली आहे. ‘कशाला राजेशाही जीवन सोडून क्रांतिकारकांना बळ देण्याच्या फंदात पडलात’, असेही हतबलतेने विचारायची वेळ आली आहे. याचे कारण म्हणजे चिमासाहेब या एका क्रांतिकारी राजाच्या वाट्याला आजही आपण कोल्हापूरकरांनी उपेक्षा दिली आहे. 8 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस म्हणजे आज त्यांची 186 वी जयंती. पण कोण हे चिमासाहेब, असाच बहुतेकांच्या दृष्टीने विषय आहे.
सीपीआर हॉस्पिटलच्या समोरील चौकातील एका छोट्या बागेत त्यांचा पुतळा आहे. तेथे बाहेरून हा पुतळा कोणालाही दिसणार नाही व आतून बाहेरचे काही दिसणार नाही, अशा अवस्थेत या पुतळ्याची स्थिती आहे. बागेचे नाव व चौकाचे नाव चिमासाहेब चौक उद्यान आहे. पुतळ्यामागे दगडी कारंजा आहे. पण तो पूर्णपणे बंद आहे. बागेत रंगीत दिवे होते. पण बरोबर 5 वर्षे झाला, ते पूर्ण बंद आहेत. बागेबाहेर पुतळ्dयाच्या एका बाजूला हातगाड्यांची रांग आहे. एका बाजूला झाडेझुडपे आहेत्रा. त्यामुळे बागेसमोरून रोज हजारो कोल्हापूरकर ये-जा करत असले तरी एकही माणूस चिमासाहेब महाराजांच्या पुतळ्याकडे पाहू शकत नाही, अशी अवस्था आहे.
त्यांचे सारे आयुष्य ब्रिटिशांच्या स्थानबद्धतेत कराचीत गेले. आता या बागेत त्यांचा पुतळाही स्थानबद्धतेत आहे, असे वाटण्यासारखीच परिस्थिती आहे. चिमासाहेब महाराजांनी स्वातंत्र्यलढ्यात आपले राजेशाहीपण पणाला लावून क्रांतिकारकांना बळ दिले. त्याची शिक्षा म्हणून सारे आयुष्य त्यांनी स्थानबद्धतेत घालवले. पण आज आपण कोल्हापूरकर त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासही कमी पडत आहोत. त्यामुळे चिमासाहेब महाराज.., आम्हाला माफ करा, यापेक्षा आपण त्यांच्या जयंतीदिनी आपण आणखी काय म्हणू शकतो.
आज जयंतीच्या पुर्वसंध्येला कोल्हापूर जिल्हा बार असोशिएशन आणि कोल्हापूर क्रांती स्मारक समिती यांच्यावतीने आज त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. उद्या, बुधवारी साऱ्या कोल्हापूरकरांनी येथे येऊन चिमासाहेब महाराजांना वंदन केले तर ते त्यांच्या स्मृतीस मोठे अभिवादन ठरणार आहे.
स्वातंत्र्य चळवळीला बळ देण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावलेल्या चिमासाहेब महाराजांच्या पुतळ्याला वर्षातून एकदाच हार घातला जातो. रोज एक छोटे फुलही आपण त्यांना अर्पण करू शकत नाही, असे या पुतळ्याच्या वाट्याला आलेले वास्तव आहे.