‘बालचमूंचा गणराया’ शहरात चर्चेचा विषय
बेळगाव : गणपती बाप्पा हा लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना आपलासा वाटतो. गणरायाविषयी असलेले प्रेम आणि भक्तीभावनेतून नानावाडी येथील काही शाळकरी विद्यार्थी मागील पाच वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहेत. विशेष म्हणजे ते स्वत:च गणेशमूर्ती तयार करून तिचे अकरा दिवस भक्तीभावे पूजन करतात. मंगळवारी रात्री या चिमुकल्यांनी वाजतगाजत मिरवणुकीने आपण तयार केलेला गणराया विराजमान केला आहे. शहरात सर्वत्र गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जात असताना आपणही का करू नये? असा विचार करून नानावाडी येथील काही शाळकरी विद्यार्थ्यांनी अतिशय लहान हातांनी गणेशमूर्ती तयार केली आहे. पहिल्या वर्षी तिचे एकाच्या घरी पूजन करण्यात आले. तेथूनच चिमुकल्यांमध्ये ही आवड निर्माण झाली आणि आज पाच वर्षे मोठ्या उत्साहात गणेशमूर्ती विराजमान होत आहे. ही बाब गणेशभक्तांसाठी औत्सुक्याची ठरली आहे. शालेय विद्यार्थी आपल्या आई-वडिलांकडून दोनशे-तीनशे रुपये जमा करून गणेशमूर्तीसाठी लागणाऱ्या सजावटीचा खर्च करत असतात. यावर्षी त्यांनी महिनाभर परिश्रम घेऊन गणेशमूर्ती तयार केली आहे.