For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘बालचमूंचा गणराया’ शहरात चर्चेचा विषय

11:05 AM Aug 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘बालचमूंचा गणराया’ शहरात चर्चेचा विषय
Advertisement

बेळगाव : गणपती बाप्पा हा लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना आपलासा वाटतो. गणरायाविषयी असलेले प्रेम आणि भक्तीभावनेतून नानावाडी येथील काही शाळकरी विद्यार्थी मागील पाच वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहेत. विशेष म्हणजे ते स्वत:च गणेशमूर्ती तयार करून तिचे अकरा दिवस भक्तीभावे पूजन करतात. मंगळवारी रात्री या चिमुकल्यांनी वाजतगाजत मिरवणुकीने आपण तयार केलेला गणराया विराजमान केला आहे. शहरात सर्वत्र गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जात असताना आपणही का करू नये? असा विचार करून नानावाडी येथील काही शाळकरी विद्यार्थ्यांनी अतिशय लहान हातांनी गणेशमूर्ती तयार केली आहे. पहिल्या वर्षी तिचे एकाच्या घरी पूजन करण्यात आले. तेथूनच चिमुकल्यांमध्ये ही आवड निर्माण झाली आणि आज पाच वर्षे मोठ्या उत्साहात गणेशमूर्ती विराजमान होत आहे. ही बाब गणेशभक्तांसाठी औत्सुक्याची ठरली आहे. शालेय विद्यार्थी आपल्या आई-वडिलांकडून दोनशे-तीनशे रुपये जमा करून गणेशमूर्तीसाठी लागणाऱ्या सजावटीचा खर्च करत असतात. यावर्षी त्यांनी महिनाभर परिश्रम घेऊन गणेशमूर्ती तयार केली आहे.

Advertisement

शाळा सुटल्यानंतर व साप्ताहिक सुटीच्या दिवशी हे शालेय विद्यार्थी एकत्र येतात आणि मूर्ती घडवत असतात. गणपती बाप्पाविषयी असलेल्या प्रेमामुळे पालकांनीही त्यांना कधी आडकाठी आणली नाही. आदित्य गवळी, शुभम गवळी, सिद्धी गवळी, सार्थक गवळी, ओम पाटील, अथर्व पाटील, गणेश पाटील, श्रेयस गवळी, स्वराज्य गिंडे, विनायक दासनट्टी हे गणेशमूर्ती घडवत असतात. आपल्याला जमेल तशी मूर्ती तयार करून तिला रंगकाम केले जाते.  रिसरातील एकाच्या घरातील खोलीमध्ये सध्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मंगळवारी या बालचमूने मोठ्या उत्साहात गणेशमूर्तीची मिरवणूक काढली. ती पाहण्यासाठी नानावाडी परिसरातील नागरिकदेखील उपस्थित होते. एखाद्या मोठ्या मंडळालाही  लाजवेल, अशा भक्तीभावाने बालचमूंकडून गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जात आहे. दररोज आरती, प्रसाद वाटप केले जात असून विसर्जनाच्या दिवशी छोटेखानी मिरवणूकदेखील काढली जाणार आहे. कोणतीही ईर्षा न बाळगता या बालचमूंचा सुरू असलेला प्रयत्न पाहून अनेकांनी आपला हात पुढे केला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.