For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी धावली शेतकऱ्यांची मुलं

04:01 PM Jan 14, 2024 IST | Kalyani Amanagi
शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी धावली शेतकऱ्यांची मुलं
Advertisement

अडीच हजारपेक्षा अधिक स्पर्धकांचा समावेश : आमदार अनिल बाबर वाढदिनाचे औचित्य : पहाटेच्या थंडीत उत्साहाने धावले अबाल वृद्ध

Advertisement

विटा प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ 'रन फॉर फार्मर' विटा मॅरेथॉनला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पहिल्याच वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत तब्बल अडीच हजाराहून स्पर्धकांनी भाग घेतला. पाच सहा वर्षांच्या बालकांच्या पासून ते सत्तरी पार केलेल्या वृद्धांनी या मॅरेथॉनचा मनमुराद आनंद लुटला. आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या मॅरेथॉनचे आयोजन केले होते. पहाटेच्या थंडीतही स्पर्धकांचा प्रतिसाद आणि उत्साह प्रचंड होता.

Advertisement

आमदार अनिल भाऊ बाबर युवा मंचच्यावतीने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मॅरेथॉनला पहिल्याच वर्षी मिळालेला प्रतिसाद पाहता पुढील वर्षी आणखी मोठ्या स्वरूपात या स्पर्धा आयोजित केल्या जातील अशी घोषणा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले.
रविवारी पहाटे साडेपाच वाजता सौ. शोभा काकी बाबर महाविद्यालयाच्या प्रांगणातून या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. तहसीलदार उदयसिंह गायकवाड व पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी झेंडा दाखवून स्पर्धेचा शुभारंभ केला. तत्पूर्वी महाविद्यालयाच्या प्रांगणात जमलेल्या स्पर्धकांच्यात झुंबा नृत्य प्रकाराने चैतन्य आणण्याचा प्रयत्न केला.

प्रारंभी दहा किलोमीटरची शर्यत सुरू करण्यात आली. सौ शोभा काकी बाबर महाविद्यालयापासून ते विट्याचा छत्रपती शिवाजी चौकातून बळवंत महाविद्यालय आणि बळवंत महाविद्यालय येथून पुन्हा याच परतीच्या मार्गावरून सौ. शोभा काकी बाबर महाविद्यालय असा दहा किलोमीटर शर्यतीचा मार्ग होता. अर्ध्या तासानंतर पाच किलोमीटरच्या स्पर्धकांना सोडण्यात आले. याच मार्गावर  पाच किलोमीटरचा प्रवास होता. स्पर्धा मार्गावर स्पर्धकांना लागणारे प्राथमिक उपचार, फळे, पाणी व एनर्जी ड्रिंक ठेवण्यात आले होते. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क नसल्यामुळे स्पर्धकांची मोठी गर्दी झाली होती. सर्व स्पर्धकांना आकर्षक टी-शर्ट देण्यात आले होते.

स्पर्धा संपताच हलगी घुमक्याच्या निनादात व डॉल्बीच्या तालावर सारे स्पर्धक आणि आलेले प्रेक्षक थिरकत होते. सकाळच्या प्रसन्नमय वातावरणात स्पर्धेची सांगता करण्यात आली. विजेत्यांना पोलीस निरीक्षक संतोष डोके व मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रॉफी आणि रोख  बक्षीस देण्यात आली. या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला संयोजकांच्या वतीने मेडल देण्यात आले. या स्पर्धेच्या सर्व ब्रँड ॲम्बेसिडर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. शुभम बाबर आणि ओम शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अनिल भाऊ बाबर युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी या मॅरेथॉन स्पर्धेचे अत्यंत नेटके नियोजन केले. दिलीप सानप, रमेश कोष्टी यांनी सूत्रसंचालन केले.

पारंपरिक वेशात धावले स्पर्धक

मॅरेथॉनमध्ये सहभागी काही स्पर्धकांनी आकर्षक वेशभूषा केली होती. यातील काही लक्षवेधी स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये शेतकऱ्यांची वेशभूषा, नऊवारी साडी असा पेहराव केलेल्या स्पर्धकांचा समावेश होता. तर पाच वर्षांच्या चिमुकल्या मुलांपासून सत्तरीच्या वृद्धांपर्यंत अबाल वृद्ध महिला, पुरुष स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी होत उत्साही वातावरणाचा मनमुरादपणे आनंद लुटला.
  
पुढच्या वर्षी आणखी मोठी मॅरेथॉन

बक्षीस वितरण समारंभात बोलताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर म्हणाले, पहिल्याच वर्षी आयोजित केलेल्या या मॅरेथॉनला जो  प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे तो पाहता पुढील वर्षी आणखी भव्य दिव्य स्वरूपात या स्पर्धा आयोजित केल्या जातील. यावर्षी केवळ पाच किलो मीटर  आणि दहा किलोमीटर अशा स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या.  पुढील वर्षी मात्र पाच आणि दहा बरोबरच 21 किलोमीटरच्या  स्पर्धा घेण्यात येतील अशी घोषणा बाबर यांनी केली.

वैद्यकीय पथक

स्पर्धेसाठी चार ठिकाणी हायड्रेशन पॉईंट व रूट सपोर्टची सुविधा ठेवली होती. मेडिकल सुविधा आणि फिजिशियन ठेवण्यात आले होते. ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेला वैद्यकीय महाविद्यालयाच्या फिजिओथेरपी विभागाचे देखिल सहकार्य मिळाले.

Advertisement
Tags :

.