बालकांनी बनविला अद्भूत ‘डीजे’
भारत नैसर्गिक प्रज्ञेचा, अर्थात ‘टॅलेंट’चा महासागर आहे, हे बऱ्याचदा सिद्ध झालेले आहे. आपल्या देशातील अनेक बालकेही नवनिर्मितीक्षम आहेत. आधुनिक तंत्रज्ञानासारख्या जटील मानल्या गेलेल्या क्षेत्रातही ही बालके सहजपणे विहार करताना दिसतात. त्यामुळे प्राथमिक शाळांमधून शिकणाऱ्या लहान मुलांकडूनही आज मोठे वैज्ञानिक प्रकल्प साकारुन घेतले जातात. उत्तर प्रदेश वैज्ञानिक प्रकल्प कार्यक्रमात काही बालकांनी सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून येत आहे.
या बालक विद्यार्थ्यांनी एक अनोखा ‘डीजे’ साकारला आहे. सध्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किंवा मिरवणुकांमध्ये डीजेचा उपयोग हटकून केला जातोच. डीजेशिवाय अशा कार्यक्रमांची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. या प्रकल्पाच्या अंतर्गत बनविण्यात आलेला हा डीजे नेहमी उपयोगात आणले जातात त्या डीजेंपेक्षा बराच भिन्न आहे. नेहमीच्या डीजेंचा ध्वनी कानांना सुखावणारा नसतो. त्याच्या दणदणाटामुळे आपली नैसर्गिक श्रवणशक्ती दुर्बळ होऊ शकते. नेहमी अशा डीजेंचा ध्वनी ऐकणाऱ्यांपैकी अनेकांना तरुण वयातच कानांना स्पष्ट ऐकू न येण्याची समस्या निर्माण होते. तथापि, बालकांनी साकारलेला हा डीजे मोठ्या ध्वनीचा असला, तरी कानांना सुखावणारा असल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे. या विज्ञान प्रदर्शनाला भेट देणाऱ्या अनेकांनी या बालकांच्या कल्पकतेचे आणि सृजनशीलतेचे कौतुक केले आहे. हा नवा डीजे दिसायलाही अतिशय सुबक आणि प्रमाणबद्ध आहे. त्यामुळे केवळ तो ऐकण्यासाठीच नव्हे, तर पाहण्यासाठीही आनंददायक आहे, अशी प्रशंसा अनेक तज्ञांनीही केली आहे.
लवकरच या डीजेचे व्यापारी उत्पादनही केले जाणार आहे. या उत्पादनाला उत्तर प्रदेश सरकारचाही हातभार लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लवकरच तो विवाहांच्या वरातींमध्ये दिसणार आहे. तसेच पुढच्या वर्षी गणपतीबाप्पांचे आगमन आणि विसर्जन यांच्या मिरवणुकांची शोभा वाढविण्याचेही काम करणार आहे. अनेक बालकांमध्ये उपजत असलेल्या प्रज्ञेला योग्य संधी आणि साहाय्य दिले गेले, तर महासत्ता बनण्याचे भारताचे स्वप्न साकारले जाणार हे निश्चित आहे.