मुलांच्या हाती वाहन, पालकांना दंडाची नोटीस
कोल्हापूर / आशिष आडिवरेकर :
मला आयुष्यभर सोयीसुविधा मिळाल्या नाहीत. मात्र माझ्या मुलांना सगळ्या सुखसोई मिळाल्या पाहिजेत अशी पालकांची मानसिकता त्यांनाच अडचणीत आणत आहे. गेल्या सहा महिन्यात 280 अल्पवयीन वाहन चालकांसह त्यांच्या पालकांवर कारवाई करुन तब्बल 13 लाख 95 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे मुलांना वाहन देताना पालकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
कुरुकली (ता.राधानगरी) येथे कॉलेज सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी थांबलेल्या विद्यार्थीनींच्या घोळक्यात भरधाव कार घुसली. यामध्ये प्रज्ञा कांबळे ही जागीच ठार झाली तर अन्य चार विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या. चौकशीनंतर कारचालक अल्पवयीन असल्याचे समोर आले. या प्रकरणी अल्पवयीन चालकासह सुरेश परीट, साताप्पा परीट यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेवरुन अल्पवयीन वाहन चालकांचा मुद्दा अधोरेखीत होत आहे.
अल्पवयीन वाहन चालकांच्या प्रमाणात वाढ होत आहे. गतवर्षी 17 ते 18 वयोगटातील 260 वाहन चालकांवर तर 16 पेक्षा कमी वय असणाऱ्या 11 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली होती. तर यंदा केवळ 6 महिन्यातच 17 ते 18 वयोगटातील 269 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर 11 वाहन चालक हे 16 वर्षाखालील असल्याचे समोर आले आहे. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असुन, पालकांनी आता याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. आपली मुले शाळा, महाविद्यालयात जाताना दुचाकीच घेऊन गेली पाहिजेत त्यांचा वेळ वाचेल त्यांना थकवा येणार नाही अशा मानसिकतेतून काही पालक मुलांच्या हातात वाहनांच्या चाव्या देत आहेत. मात्र हेच प्रसंग मुलांच्या करिअरच्या दृष्टीने घातक ठरत आहेत.
- मित्राची दुचाकी फिरवणे पडले महागात ...
शहर वाहतूक शाखेने गुरुवारी शहरातील एका शाळेसमोर अल्पवयीन वाहन चालकावर कारवाई केली. एका मित्राचे वाहन दुसरा मित्र घेऊन तिब्बल सीट निघाला होता. शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी या तिघांना थांबवून त्यांच्यावर कारवाई केली. तब्बल 11 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहन चालविणाऱ्या मुलाचे पालक, वाहन ज्याचे होते त्याचे पालक असा 10 हजार रुपये आणी तिब्बल सिटचा 1 हजार असा दंड वसूल करण्यात आला.
- दंड न भरल्यास कोर्टाची पायरी
अल्पवयीन वाहन चालक वाहन चालवताना आढळल्यास चालकास आणि त्याच्या पालकांना प्रत्येक 5 हजार रुपयांचा दंड करण्यात येत आहे. हा दंड भरण्यासाठी 15 ते 1 महिन्याच्या आत भरणे गरजेचे आहे. हा दंड या मुदतीमध्ये भरला नाही तर त्यांच्यावर न्यायालयात खटला पाठवला जातो. हा खटला अल्पवयीन चालक आणि त्याचे पालक या दोघांवरही सुरु राहतो. याचे गंभीर परिणाम मुलांच्या करिअरवर होत आहे.
- शाळेपासून लांब पार्किंग
सध्या शाळा आणी महाविद्यालयांमध्ये दुचाकी वाहने घेवून जाण्याची फॅशन आहे. पालकही आपल्या मुलांचा वेळ वाचावा रिक्षा, बस यासाठी वेटींग करावे लागू नये यासाठी दुचाकी शाळेतील मुलांच्या हातात देत आहेत. शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात तपासणी असल्यामुळे शाळेपासून काही अंतरावर वाहने लावून येण्यावर मुलांचा भर आहे. शाळा, महाविद्यालयासमोरील बोळांमध्ये वाहने पार्क करण्यात येत आहेत.
शहरातील शाळा, महाविद्यालये सुरु झाल्यामुळे विशेष मोहीम शहर वाहतूक शाखेच्या वतीने सुरु करण्यात आली आहे. अल्पवयीन वाहनचालक आणी त्यांच्या पालकांवर कारवाई करण्यात येत आहे. यामुळे अल्पवयीन चालकांना वाहन देऊ नये नाही तर पालकांना दंडात्मक कारवाईसह न्यायालयीन कारवाईस सामोरे जावे लागेल.
-नंदकुमार मोरे, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा
2024
17 ते 18 वर्षे - 260 कारवाई 11 लाख 90 हजार
16 वर्षापेक्षा कमी - 11 कारवाया 55 हजार
2025
17 ते 18 वर्षे - 269 कारवाई 13 लाख 40 हजार
16 वर्षापेक्षा कमी - 11 कारवाया 55 हजार
- अल्पवयीन चालक आणी घटना
- 21 जून 2024 पुणे कल्याणीनगर येथे अगरवाल या अल्पवयीन तरुणाने भरधाव अलिशान कारने ठोकरल्याने डॉक्टर तरुणीचा मृत्यू.
- 8 जुलै 2024 रोजी जुना पुणे - मुंबई महमार्गावर बापेडी नजीक गस्त घालणाऱ्या पोलिसांना अल्पवयीन वाहन चालकाने ठोकर दिल्याने एका पोलिसाचा मृत्यू
- 24 जुलै 2025 कुरुकली (ता. राधानगरी) येथे भरधाव कार विद्यार्थीनींच्या घोळक्यात घुसली एक ठार.