मुलाला भरपूर होमवर्क, पोलिसांकडे तक्रार
संतप्त पित्याने उचलले विचित्र पाऊल
जगात तुम्हाला एकाहून एक अजब व्यक्ती भेटतील. तसेही शाळेत शिक्षकांकडून देण्यात येणाऱ्या होमवर्कमुळे मुलांपासून त्यांचे आईवडिलही त्रस्त होतात, परंतु एका इसमाने केलेले कृत्य पाहून लोकांना धक्का बसला आहे. ही पूर्ण घटनाच मजेशीर आहे. सर्वसाधारणपणे शाळेत मुलांना होमवर्क दिला जातो, परंतु अमेरिकेत एका व्यक्तीने स्वत:च्या मुलाचा होमवर्क पाहिल्यावर त्याने संबंधित शाळेत फोन केला, तेथून त्याला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने थेट पोलिसांशी संपर्क साधला. तर पोलिसांकडून त्याला मिळालेले उत्तर अत्यंत अनोखे होते. अमेरिकेच्या ओहायो प्रांतातील इसमाने मुलाचा होमवर्क पाहून वेगळेच पाऊल उचलले. या इसमाचे नाव अॅडम सिजेमोर असून तो स्वत:च्या मुलाला देण्यात येणाऱ्या होमवर्कमुळे त्रस्त झाला होता. त्याने यासंबंधी प्रिन्सिपल जेसन मर्ज यांच्याशी संपर्क साधला होता. तर अॅडम यांनी सातत्याने धमक्या दिल्याचा आरोप शाळेने केला आहे. यामुळे शाळेने त्याच्या कॉलला उत्तर देणेच बंद केले होते.
पोलिसांनाही केला फोन
अखेर सिजमोरने ऑक्सफोर्ड पोलीस विभागाला फोन करण्यास सुरुवात केली आणि तासाभरात 18 वेळा कॉल केले. पोलीस प्रमुखाशी बोलता न आल्याने तो भडकला आणि त्यांच्या घरी भेटण्यासाठी जाणार असल्याने सांगू लागला. अशा स्थितीत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. माझ्यावर शाळेकडून करण्यात आलेले आरोप योग्य नाहीत. मी सिंगल पिता असून मला दोन मुले आहेत. अशा स्थितीत त्यांचे पालनपोषण करण्यासाठी संघर्ष करतोय असे सिजमोरने म्हटले आहे.