For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बालक-गर्भवतींचे अंडी अनुदान थांबले!

11:15 AM Oct 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
बालक गर्भवतींचे अंडी अनुदान थांबले
Advertisement

अंगणवाडी केंद्रे अडचणीत : आरोग्याबाबत चिंता

Advertisement

बेळगाव : कुपोषण दूर करण्यासाठी अंगणवाडीला पुरवठा करण्यात येणाऱ्या अंड्याचे अनुदान थांबले आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना स्वत:चे पैसे खर्च करून अंडी खरेदी करण्याची वेळ आली आहे. आधीच अंगणवाडी सेविकांचे वेतन थांबले आहे. त्यातच अंड्यांचे अनुदानही थांबल्याने अंगणवाडी सेविका दुहेरी संकटात सापडल्या आहेत. जिल्ह्यात 5656 अंगणवाडी केंद्रे आहेत. त्यापैकी 3 लाख 79 हजार 704 बालकांना या सुविधेसाठी पात्र आहेत. मात्र अंड्याचे अनुदानच थांबल्याने बालक आणि गर्भवती महिलांना अंड्यापासून दूर रहावे लागले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या समग्र शिशू अभियान योजनेंतर्गत बालक आणि गर्भवती महिलांच्या पौष्टिक आहारासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. मात्र प्रत्यक्षात अंड्यांचे अनुदान थांबल्याने बालकांना अंड्यापासून वंचित रहावे लागले आहे.

प्रति अंडे 6 रुपये खर्च 

Advertisement

गर्भवती महिला आणि बालकातील कुपोषण टाळण्यासाठी शासनाकडून अंडी दिली जातात. तीन महिन्यांतून एकदा अंडी खरेदीसाठी आगाऊ रक्कम दिली जाते. मात्र मागील सहा महिन्यांपासून ही रक्कम दिली गेली नाही. गर्भवती महिलांना 25 अंडी वितरित करणे आवश्यक आहे. प्रति अंडे 6 रुपये खर्च येतो. त्यामुळे अंड्याचा खर्च कोठून करावा, असा प्रश्नही अंगणवाडी सेविकांसमोर पडला आहे. अंगणवाडीतील बालक आणि गर्भवती महिलांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी आहार सामुग्री वितरित केली जाते. मात्र आता आहार सामुग्री वितरणही लांबणीवर पडू लागले आहे. अंड्यांचे अनुदानही थांबले आहे. त्याबरोबर सेविका आणि मदतनिसांचे वेतनही ठप्प झाले आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रे चोहीकडून अडचणीत आली आहेत. अंगणवाडी केंद्रातून सकस आहाराबरोबर अंडी, चक्की आणि दूध पावडर मिळत असल्याने बालकांच्या आरोग्याबाबत भीती व्यक्त होत आहे.

सर्व अधिकाऱ्यांना सूचना 

अंडी खरेदीचे पैसे अदा करण्यास विलंब होत नाही. ज्या तालुक्यामध्ये पैसे मिळाले नाहीत. त्या तालुक्यांमध्ये पैसे अदा करण्याची कार्यवाही केली जाईल. याबाबत सर्व अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.

-  नागराज आर. (सहसंचालक महिला व बालकल्याण खाते)

Advertisement
Tags :

.