जन्मदात्यांकडून मुलाचा पेटवून खून
जमखंडी तालुक्यातील बिदरी गावातील घटना : मोठ्या भावाचाही सहभाग : तिघांना पोलिसांकडून अटक
वार्ताहर/जमखंडी
जन्मदात्यांनी मोठ्या मुलाच्या मदतीने लहान मुलाची जाळून हत्या केल्याची घटना जमखंडी तालुक्यातील बिदरी गावात घडल्याचे उशिरा उघडकीस आले. अनिल परप्पा कानट्टी (वय 32) असे खून झालेल्या मृत युवकाचे नाव आहे. मृताचे वडील परप्पा मल्लप्पा कानट्टी (वय 62), आई शांता परप्पा कानट्टी (वय 55) आणि भाऊ बसवराज परप्पा कानट्टी (वय 35) अशी संशयितांची नावे असून त्यांना पोलिसांनी अटक केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, जमखंडी तालुक्यातील बिदरी येथील मळ्यातील घरात कानट्टी कुटुंब राहत असून अनिलला दारूचे व्यसन जडले आहे. यातून तो दररोज घरी येऊन पालकांशी वादावादी करीत होता. त्याला अनेकवेळा समज देऊनही त्याने दारू सोडली नव्हती. या त्याच्या दारूच्या व्यसनातून दररोज घरात वादावादीचे प्रकार घडत होते. दरम्यान, शुक्रवार 5 रोजी रात्री देखील अनिल आणि त्यांच्या घरच्यांमध्ये वादावादी झाली. यावेळी आई-वडील व मोठ्या भावाने अनिलला मारहाण केली. तसेच घरातील कॅनमध्ये असलेले डिझेल त्याच्या अंगावर ओतून त्याला पेटवून दिले. यानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी एसपी सिद्धार्थ गोयल, जमखंडीचे डीवायएसपी सय्यद रोशन जमीर, सीपीआय मल्लाप्पा मड्डी यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. सावळगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.