ट्रान्स्फॉर्मरवरील पतंग काढताना बालकाला विजेचा धक्का
रुक्मिणीनगरातील घटनेत विद्यार्थी जखमी
बेळगाव : ट्रान्स्फॉर्मरमध्ये अडकलेला पतंग काढताना विजेचा धक्का बसून शाळकरी मुलगा जखमी झाला आहे. गुरुवारी दुपारी रुक्मिणीनगर परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने पतंगामुळे होणाऱ्या दुर्घटना पुन्हा एकदा सामोऱ्या आल्या आहेत. आर्यन सुनील केसरकर (वय 13) रा. रुक्मिणीनगर असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. हे कुटुंबीय मूळचे खंजर गल्लीचे असून सध्या रुक्मिणीनगर येथे वास्तव्य आहे. शाळांना सध्या दसऱ्याची सुटी आहे. सुटीत पतंग खेळण्याचा आनंद घेताना ही दुर्घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. जखमी आर्यनला सुरुवातीला सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. रात्री तेथून खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. उपलब्ध माहितीनुसार आर्यन पतंग उडवत होता. त्यावेळी पतंग ट्रान्स्फॉर्मरमध्ये अडकला. तो काढताना विजेचा धक्का बसून तो खाली पडला. पतंगाचा मांजा अडकून जखमी होणे, पतंग उडविताना वीजतारेचा स्पर्श होऊन दुर्घटना घडण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. मध्यंतरी मांजामुळे दुचाकीस्वारांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन पोलीस दलाने चिनी मांजा विक्रीवर बंदी आणली होती. पतंग उडवताना होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.