पाण्याच्या टाकीत पडून चिमुरड्याचा मृत्यू
खेड :
क्रिकेट खेळत असताना शौचालयाच्या टाकीवर बॉल घेण्यासाठी गेलेला 7 वर्षीय चिमुरडा नजीकच्या बंदिस्त करण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत पत्र्याच्या झाकणाचा अंदाज न आल्याने पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. कार्तिक संजय मोरे (रा. दाभिळनाका, मूळ गाव आकाडा-बाळापूर, हिंगोली) असे मृत चिमुरड्याचे नाव आहे. या दुर्घटनेने मोरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
कार्तिक हा कामगार वसाहतीतील मोकळ्या मैदानात अन्य मुलांसमवेत क्रिकेट खेळत होता. शौचालयाच्या टाकीवर गेलेला बॉल घेण्यासाठी जात असताना नजीकच्या बंदिस्त करण्यात आलेल्या टाकीच्या पत्र्याच्या झाकणाचा अंदाज न आल्याने पाण्याच्या टाकीत पडला. त्याच्यासोबत खेळणाऱ्या अन्य लहान मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर ही बाब वसाहतीतील एका महिलेच्या निदर्शनास आली.
वसाहतीतील आजूबाजूच्या लोकांना बोलावल्यानंतर चिमुरड्यास टाकीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर उपचारासाठी रुग्णवाहिकेने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले असता मृत घोषित केले. सायंकाळी उशिरा येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.