मूल दत्तक प्रक्रिया...जाणून घेऊया!
अनाथाश्रमांतूनच मूल दत्तक घेणे कायदेशीर, परदेशी जोडप्यांकडूनही मागणी, दत्तक महिना म्हणून नोव्हेंबरची ओळख
बेळगाव : आजकाल विविध कारणांनी अनेकजण आपल्या मुलांना इतरत्र सोडून जातात. मात्र अशा मुलांसाठी अनेक सेवा संस्था पुढे येऊन त्यांचा सांभाळ करतात व त्यांची देखभाल करतात. बेळगाव येथील स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठान संचालित गंगम्मा चिक्कुंबीमठ कल्याण केंद्रात अशीच 0 ते 18 वयोगटातील 80 निराधार मुले वास्तव्यास असून यामध्ये 40 मुले व 40 मुली आहेत. येथे 20 कर्मचारी कार्यरत असून मुलांची देखभाल करत आहेत. या वर्षाच्या जानेवारी ते नोव्हेंबरअखेर 5 मुलांना दत्तक घेण्यात आले असून 4 देशांतर्गत तर 1 परदेशातील दाम्पत्याने दत्तक घेतले आहे.
मुलांची दत्तक प्रक्रिया सुरू असून एक अमेरिका व एक मंगळूर येथील दाम्पत्याने दत्तक घेतले आहे. निराधार व विशेष गरज असलेल्या मुलांना दत्तक घेण्याच्या उद्देशाने जागतिक दत्तक महिना म्हणून नोव्हेंबर ओळखला जातो. या संपूर्ण महिन्यात निराधार व विशेष गरज असलेल्या मुलांना दत्तक घेण्याबाबत विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात येते. 2025-26 सालासाठी ‘विशेष गरज असलेल्या मुलांची दत्तक प्रक्रिया’ या ब्रीद वाक्याद्वारे जिल्ह्यात बाईक रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तसेच निराधार व विशेष गरजवंत मुलांना बेकायदेशीरपणा टाळून कायदेशीर प्रक्रियेद्वारे दत्तक घेण्याचे आवाहनही करण्यात आले.
मुलांना दत्तक घेण्यास इच्छुक असणाऱ्या दाम्पत्यांनी किंवा दत्तक घेऊ इच्छिणाऱ्यांनी मुलांना कायदेशीररित्या दत्तक घेण्याची काळजी घ्यावी. विशेष गरज असलेल्या मुलांना दत्तक घेण्यासाठी देशवासीय पुढे येण्यास कचरतात. मात्र, परदेशी लोक नि:संकोचपणे विशेष गरज असलेल्या मुलांना दत्तक घेण्यासाठी पुढे येत आहेत. देशवासियांनी अपंग मुलांना दत्तक घेऊन त्यांना नवजीवन देऊन दयाळूवृत्ती दाखविण्याची गरज आहे. यासाठी देशवासियांनी निराधार मुलांना दत्तक घेऊन त्यांचे उज्ज्वल भविष्य बनविण्याची आवश्यकता आहे.
मुलांना हॉस्पिटल, मध्यस्थ व इतर कोणत्याही प्रक्रियेद्वारे दत्तक घेणे गुन्हा आहे. जर बेकायदेशीरपणे मुलांना दत्तक घेतल्यास दत्तक घेणाऱ्यांना भविष्यात समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. जे लोक बेकायदेशीरपणे मुलांची विक्री किंवा त्यांना जबरदस्तीने घेऊन जातात अशांवर बाल न्याय कायदा 2015 च्या कलम 81 अंतर्गत गुन्हा दाखल करून घेण्यात येतो. दोषींना 5 वर्षांपर्यंतचा कारावास व एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा भोगावी लागते. जर या कृत्यांमध्ये हॉस्पिटलमधील डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्यास त्यांना 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूदही कायद्यांतर्गत करण्यात आली आहे.
बाल न्याय कायदा 2015 व दत्तक नियम 2022 नुसार मुलांना कायदेशीररित्या दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते. शहरात व जिल्ह्यात 0 ते 6 वर्षे वयोगटातील अनाथ मुले आढळून आल्यास 1098 या हेल्पलाईन जारी करण्यात आली आहे. तसेच जिल्हा बाल संरक्षण युनिट व पोलीस विभागाला कळविल्यास सदर मुलांचे संरक्षण करणे सोपे होणार आहे. तसेच त्यांना दत्तक केंद्र ठेवून मुलांना कौटुंबिक वातावरणात वाढविण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
जिल्ह्यात दत्तक योजना राबविण्यासाठी 1098 चाईल्ड हेल्पलाईन, जिल्हा बाल संरक्षण युनिट, बाल कल्याण समिती, जिल्हा विशेष दत्तक संस्था कार्यरत आहेत. मुले दत्तक घेऊ इच्छिणाऱ्यांना सदर संस्थांना संपर्क साधता येणार आहे. जिल्हा बाल संरक्षण युनिटअंतर्गत दोन केंद्रे कार्यरत आहेत. रामतीर्थनगर येथे विशेष दत्तक केंद्र व सुभाषनगर येथे स्वामी विवेकानंद दत्तक केंद्र कार्यरत आहे. या दोन्ही केंद्रांवर 0 ते 6 वयोगटातील अनाथ मुले असून तेथे त्यांची सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे.
दत्तक घेऊ इच्छिणाऱ्यांनी ‘कारा’ नियमानुसार http://www.cara.wed.gov.in या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज केलेले भारतीय व परदेशी दांपत्य मुलांना दत्तक घेऊ शकतात. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सदर दांपत्यांना मुले दत्तक देण्यात येतात. 2008 पासून जिल्ह्यात एकूण 157 मुले दत्तक घेण्यात आली आहेत. देशांतर्गत 144 तर 13 विविध देशांतील दांपत्यांनी मुलांना दत्तक घेतले आहे. यामध्ये अमेरिका 10, इटली 1, ऑस्ट्रेलिया 1 व माल्टा देशात एक मूल दत्तक देण्यात आले आहे.
दत्तक घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून नियम शिथिल करण्यात आले आहे. याआधी वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज अनिवार्य आहे. तसेच इच्छुकांना कोणत्या राज्यातील मुलांना दत्तक घ्यावयाचे आहे, याचा पर्यायही ठेवण्यात आला आहे. अर्जासाठी 6 हजार रुपयांचे शुल्क आकारण्यात येते. त्यानुसार शाळेचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, दाम्पत्य असतील तर त्यांचा लग्नाचा दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड, रहिवाशी दाखला व नातेवाईक किंवा मित्रपरिवाराचे हमीपत्र संबंधित संस्थेकडे सादर करणेही अत्यावश्यक आहे.
दत्तक प्रक्रिया...
- यंदा जानेवारी ते नोव्हेंबरअखेर 5 मुलांना घेतले दत्तक
- मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी केंद्र सरकारचे नियम शिथिल
- हॉस्पिटल, मध्यस्थ व इतर प्रक्रियेद्वारे दत्तक घेणे गुन्हा
- 0 ते 6 वयोगटातील अनाथ मूल आढळल्यास 1098 हेल्पलाईन जारी