चिकोडी बायपास, गोटूर-कागवाड रस्ताकामाला लवकरच प्रारंभ
मंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती : चिकोडीत साधला जनतेशी संवाद
प्रतिनिधी/ बेळगाव
चिकोडी भागातील जनतेची अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या चिकोडी बायपास रस्ता व गोटूर-कागवाड रस्ता निर्माण कार्याला लवकरच सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती बांधकाम तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
चिकोडी येथील खासदारांच्या कार्यालयात शनिवारी नागरिकांकडून अहवाल स्वीकारल्यानंतर पत्रकारांसमोर मंत्री जारकीहोळी बोलत होते. गोटूर-कागवाड रस्ता कामाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, या रस्त्याच्या कामासाठी निविदा मागविली असून, कामाला लवकरच सुरुवात करण्यात येईल. उ. कर्नाटकातून यापूर्वी अनेकजणांना बांधकाम खाते मिळालेले आहे. मात्र जनतेच्या अपेक्षेप्रमाणे रस्त्यांची कामे झाली नाहीत अशी तक्रार नेहमी सुरू असते, असे पत्रकारांनी छेडले असता यावर मंत्री जारकीहोळी म्हणाले की, यापूर्वीच्या सरकारी कामाबाबत आपणाला माहिती नाही. मात्र आपण बांधकाम मंत्री झाल्यानंतर अनेक रस्त्यांची सुधारणा केली आहे. याशिवाय नवीन रस्तेही तयार केले असून अद्यापही कामे सुरू आहेत.
चिकोडी, =गोकाक जिल्हे व्हावेत
बेळगाव जिल्हा विभाजनासाठी केंद्र सरकारने 30 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता मंत्री जारकीहोळी म्हणाले की, बेळगाव जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजे. चिकोडी व गोकाक असे दोन जिल्हे होणे अपेक्षित आहे. यासाठी आमचेही प्रयत्न सुरू आहेत. जनतेच्या समस्या प्रामाणिकपणे जाणून घेण्यात येत आहेत. काही ठिकाणी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांमार्फत जागेवरच समस्या सोडविल्या आहेत. उर्वरीत समस्या टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येतील, असे मंत्री जारकीहोळी म्हणाले.
चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, केपीसीसीचे मुख्य सचिव महावीर मोहिते, श्याम रेवडे, शिवू मराई, रमेश सिंदगी, शंकरगौडा पाटील, राजू कोटगी आदी यावेळी उपस्थित होते.