मुख्यमंत्र्यांचा दौरा अन् हायवेवरील मलमपट्टी
गेल्या तेरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाची पाहणी गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु सध्याची पावसाळी स्थिती पाहता आणि केवळ मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खड्डे बुजविण्याची केली जाणारी मलमपट्टी म्हणजे धूळफेकच ठरत आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने गणेशोत्सव काळात गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होईल, याची गॅरंटी दिलेली नाही. पण पुढील काळात चौपदरीकरण कामाला वेग येऊन पुढील वर्षाच्या गणेशोत्सवापूर्वी महामार्गाचे काम पूर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा तुर्तास बाळगूया.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास जाणे हा संशोधनाचा विषय ठरला आहे. आजवर महामार्गाचे तेरा वर्षे काम रखडणारा हा पहिलाच महामार्ग असेल. म्हणूनच की काय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावर एक पुस्तक लिहिले जाऊ शकते, असे म्हटले होते. त्यांचे हे विधान खरेच आहे, असे म्हणावे लागेल. हा महामार्ग होण्यासाठी अनेक आंदोलने झाली. पत्रकारांनीही आंदोलने केली. प्रत्येकवेळी मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाच्या पूर्णत्वासाठी डिसेंबरची डेडलाईन दिली गेली. परंतु डिसेंबर 2023 चा, 2024 चा की 2025 चा हे सांगितलेलं नाही. फक्त ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम योग्यप्रकारे होऊन लवकरात लवकर होण्यासाठी जनआक्रोश आंदोलने झाली. त्यावेळी मंत्रीमहोदय किंवा लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्षच झाले. महामार्गाची सर्वांना आठवण येते, ती फक्त गणेश चतुर्थीला. मुंबईहून येणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर टीका करण्याचे सुख नेहमी घेतात आणि मंत्री महोदय महामार्ग पाहणी दौरा करून एक वर्षाची मलमपट्टी लावून समस्त कोकणवासीयांच्या डोळ्यात धूळफेक करतात. दरवर्षी हा नित्यक्रम सुरू आहे. त्यामुळे महामार्गाचे काम सुरू होऊन अजूनही तो रखडलेलाच आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने का होईना, चौपदरीकरण कामाला वेग यायला पाहिजे होता...पण तोही येईना. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचं करायचं काय, असा प्रश्न पडत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनांची वाढती संख्या, तळ कोकणातील पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा तसेच अपघातांची संख्या कमी व्हावी, या सर्व गोष्टींचा विचार करून मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण काम हाती घेण्याचे ठरले आणि कुठलीही आडकाठी न येता कामाला सुरुवातही झाली. खरंतर कुठलाही प्रकल्प कोकणात यायचा झाला की, कोकणी जनता त्याला विरोध करते, असे बोलले जाते. परंतु चौपदरीकरण कामाचे कोकणी जनतेने स्वागतच केले. त्यामुळे 2011 ला पळस्पे ते इंदापूरपर्यंतच्या कामाची सुरुवात झाली, तर 2014 मध्ये राज्यात व केंद्रात युतीचे सरकार आल्यावर इंदापूर ते झाराप या 366 किमीच्या कामाला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाच्या कामाला गती मिळावी, यासाठी या कामांचे दहा टप्पे केले. यातील फक्त सिंधुदुर्ग वगळता रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील महामार्गाचे काम अपूर्ण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2016 मध्ये काम सुरू होऊन 2020 मध्ये पूर्णही झाले. मात्र, रत्नागिरी व रायगडमध्ये माणगाव, इंदापूर बायपास, फ्लायओव्हर, चिपळूणचे कोसळलेले ब्रीज अशी अनेक कामे आजही अपूर्ण आहेत. ही कामे लागलीच पूर्ण होतील, अशी शक्यता नाही. त्यासाठी नियमित कामाला वेग आला, तरच महामार्ग पूर्णत्वास जाण्याचे कोकणवासीयांचे स्वप्न पूर्ण होईल आणि सर्वांचाच प्रवास सुखकर होईल.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गती नसल्याने महामार्गावर ठिकठिकाणी अर्धवट कामे सोडलेली आहेत. काही ठिकाणी तात्पुरते मार्ग बदलले होते. परंतु, ब्रिजच्या कामात गती नसल्याने आहेत तसेच आहेत. सिंधुदुर्गातही महामार्ग पूर्ण होऊन सुद्धा मिडलकट बंद केलेले नाहीत. त्यामुळे या सर्वांचा परिणाम म्हणून महामार्गावर अपघातांची संख्या वाढून अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे रखडलेला महामार्ग पूर्ण कधी होईल, याचीच प्रतिक्षा लागून राहिली आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी हे संवेदनशील मंत्री व आपल्या कामात गतिमानतेने काम करणारे म्हणून ओळखले जातात. मग मुंबई-गोवा महामार्गाबाबतच माशी कुठे शिंकते, असा प्रश्न पडतो. कुठल्याही कामात अडचणी, तर येणारच. या अडचणींवर मात करून अर्धवट महामार्ग पूर्णत्वास नेण्याचे यश मिळवावे, असे अपेक्षित आहे.
कोकणातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या 13 वर्षांपासून रखडले आहे. पेणपासून सिंधुदुर्गपर्यंत चौपदरीकरणाचे काही टप्पे पूर्णत्वास गेले असले, तरी रखडलेल्या टप्प्यांमध्ये पावसाळ्यात पडणारे खड्डे दरवर्षी गणेशोत्सवात येणाऱ्या चाकरमान्यांना तापदायक ठरत आहेत. दरवर्षी खड्डेयातून जाणे नित्याचे झाले आहे. गणेशोत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांना महामार्गाची एक मार्गिका सुरू करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी एक-दोन नव्हे, तर तब्बल नऊ दौरे महामार्गाची पाहणी करण्यासाठी गतवर्षी काढले. मात्र, त्यातून फारसे काही घडले नाही. केवळ गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरण्याची मलमपट्टी झाली. गणेशोत्सवानंतरही अधून-मधून पाहणी दौरे करून महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला असता, तर कदाचित महामार्गाचे काम प्रगतीपथावर गेलेले दिसले असते.
राजकीय टीका करणारे सत्ताधारी विरोधक गणेशोत्सव आला की, महामार्गाच्या बाबतीत जागे होतात, यावर्षीही तसेच झाले आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी महामार्गाचे काम रखडण्यास सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना जबाबदार धरत टीका केली. त्यांच्या टीकेला उबाठा सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनीही पाठिंबा दिला. त्यांना मंत्री चव्हाण यांनीही चोख उत्तर देत, तुम्ही एवढी वर्षे काय केले, असा उलट सवाल केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाचा पाहणी दौरा केला, त्यात मंत्री चव्हाण सहभागी झाले होते.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गाचे काम अर्धवट टाकणाऱ्या ठेकेदारांना जेलमध्ये टाकणार, असे सांगितले. तसेच गणेश चतुर्थीपूर्वी महामार्गावरील सर्व ख•s बुजविले जातील, असे सांगितले. परंतु, चौपदरीकरणाचे काम कधी पूर्ण होणार हे सांगितले नाही. त्यामुळे चौपदरीकरण काम अर्धवटच राहणार आहे आणि पुढील वर्षी पुन्हा एकदा मंत्र्यांचे दौरे होऊन गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरण्याचा नित्यक्रम सुरुच राहील, हेच स्पष्ट होते. महामार्गाचे काम असो किंवा अन्य कुठल्याही रस्त्याचे काम अर्धवट टाकणाऱ्या किंवा निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली जाईल, असे अनेकवेळा सांगितले जाते. प्रत्यक्षात ठेकेदारांवर किरकोळ स्वरुपात दंडात्मक कारवाई वगळता काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. खरेतर मंत्र्यांचे दौरे आणि खड्डे भरण्यामध्ये होणारा कोट्यावधी रुपये खर्च चौपदरीकरण कामावर केला असता, तर महामार्गाचे अर्धे अधिक काम झाले असते. मुख्यमंत्र्यांच्या महामार्ग पाहणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महामार्ग प्राधिकरणने महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे. परंतु, सध्या पावसाळा सुरू आहे. कोल्ड मिक्स डांबरने ख•s भरले, तरी अतिवृष्टीमुळे ख•s लगेचच उखडणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर खड्डे भरून मलमपट्टी करणे म्हणजे केवळ धूळफेकच आहे, असे म्हणावे लागेल.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यामुळे महामार्ग प्राधिकरणची यंत्रणा जागी झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर खड्डे भरण्याची धूळफेक केली जात असली, तरी आगामी काळात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने कामाला गती येवो. डिसेंबरमध्ये काम पूर्णत्वास नेण्यासाठी दिली जाणारी तारीख खरी ठरो, अशी अपेक्षा बाळगूया.
संदीप गावडे