खाणी सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार
खाण अधिकाऱ्यांसोबत बैठकीत घेतला आढावा, खाण आणि भूगर्भ खात्याच्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती,
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील खाण व्यवसाय सुरू करण्याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खाण आणि भूगर्भ खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यात प्रामुख्याने लिलाव झालेल्या खाणी पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्याशिवाय खात्याला भेडसावणाऱ्या समस्या आणि तक्रारींचीही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
पर्वरी मंत्रालयात आयोजित या बैठकीला खाण खात्याच्या अधिकाऱ्यांसह पर्यावरण, जलस्रोत आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी अन्य संबंधित खात्यांचे प्रमुख देखील उपस्थित होते.
लिलाव झालेल्या खाणी पुन्हा सुरू करणे, नव्या खनिज लिजांचे लिलाव करणे, वाळू उत्खनन तसेच अन्य गौण खनिजांचे पुन्हा नियमन करणे आदी विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाली.
खाण खात्याने हल्लीच होंडा, सुळकर्णे आणि कोडली या आणखी तीन खाण ब्लॉकच्या ई-लिलावासाठी निविदा जारी केल्या होत्या. ई-लिलाव वेबसाईटवर निविदा दस्तऐवज खरेदी करण्यासाठी दि. 24 सप्टेंबर 2024ची अंतिम तारीख आहे तर बिड सादर करण्यासाठी दि. 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
आतापर्यंत कुडणे, सुर्ला-सोनशी, अडवलपाल-थिवी, पिर्णा-थिवी, काले-सांगे, मुळगाव-डिचोली, मये-शिरगांव आणि मोन्ते दे शिरगांव या खनिज ब्लॉक्सचा लिलाव करण्यात आला आहे.