दुष्काळी निधीवर आज मुख्यमंत्र्यांची मोदींशी चर्चा
सिद्धरामय्या नवी दिल्लीत : पंतप्रधानांची भेट घेणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी वेळ निश्चित करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी 11:30 वाजता सिद्धरामय्या नवी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतील. यावेळी ते दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याला निधी मंजूर करण्याची विनंती करतील. त्यामुळे या भेटीकडे राज्यातील राजकारण्यांचे लक्ष लागले आहे.
दुष्काळी मदतनिधी मंजूर करण्याच्या बाबतीत केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. पंतप्रधानांसह केंद्रातील मंत्र्यांच्या भेटीसाठीही वेळ दिला जात नाही, अशी टीका मागील आठवड्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेळगावमधील विधिमंडळ अधिवेशनात केली होती. राज्य सरकारवर टीका करण्यापेक्षा पंतप्रधानांच्या भेटीसाठी केंद्र सरकारवर दबाव आणा, असा प्रहारही सिद्धरामय्यांनी भाजप आमदारांवर केला होता.
या घडामोडीदरम्यान मंगळवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या पंतप्रधान यांना मोदींची भेट घेण्याची संधी मिळाली आहे. ते मोदींची त्यांच्या कार्यालयात भेट घेतील. याप्रसंगी राज्याला दुष्काळी मदतनिधी देण्यासह विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. पीकनुकसान, दुष्काळ निवारण कामांसाठी आवश्यक निधी, केंद्रीय पथकाने केलेल्या अध्ययन दौरा याविषयी ते पंतप्रधानांना माहिती देतील.
महात्मा गांधी रोजगार हमी (मनरेगा) योजनेतील कामांचे दिवस 150 पर्यंत वाढविण्याची विनंती सिद्धरामय्या पंतप्रधान मोदींकडे करतील. केंद्रीय अध्ययन पथकाने राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना भेटी देऊन अहवाल सादर केला आहे. तरी सुद्धा केंद्राकडून मदतनिधी देण्यात आलेला नाही. केंद्र सरकारने वेळीच राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधी मंजूर करावा, अशी विनंती ते करणार असल्याचे समजते.
अमित शहा यांच्या भेटीसाठी प्रयत्नशील
चार दिवसांच्या नवी दिल्ली दौऱ्यावर गेलेले सिद्धरामय्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेणार आहेत. परंतु, या भेटीसाठी अद्याप वेळ निश्चित झालेला नाही. 21 डिसेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतही सिद्धरामय्या सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत या बैठकीत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार देखील सहभागी होतील. त्यानंतर ते शुक्रवारी ते बेंगळुराला परततील.