मुख्यमंत्री सिद्धरामय्या 100 टक्के भ्रष्ट
विरोधी पक्षनेते आर. अशोक यांचा आरोप
बेंगळूर : राज्यातील जनतेला 40 टक्के खोटे बोलून सत्तेवर आलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे 100 टक्के भ्रष्ट आहेत. गेल्या 18 महिन्यांच्या काँग्रेस सरकारच्या कालावधीत दररोज एक मंत्री लुटत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केला. बेंगळुरात पत्रकारांशी ते बोलत होते. सिद्धरामय्या यांनी त्यांचे 40 वर्षांचे आयुष्य एक खुले पुस्तक असल्याचे म्हटले आहे. आज त्या पुस्तकाची पाने उघडली तर त्यावर लुटीचे काळे ठिपके दिसतात. सिद्धरामय्या यांनी नियुक्त केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांकडूनच त्यांची चौकशी होणे हे राज्यातील जनतेचे दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या निवडणूक प्रचारादरम्यान अबकारी खात्यात 700 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा उल्लेख प्रधान मंत्र्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याबाबत पुरावे विचारले आहेत. तो आरोप पंतप्रधान मोदींनी केलेला नाही. कर्नाटक राज्य दारू विव्रेता संघटनेने असा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांनी दारू विव्रेते संघटनेने लिहिलेले पत्र एकदा वाचावे. परवाना नूतनीकरणाचे दर, प्रत्येक दारू दुकानातून मासिक पैशाच्या नावाखाली किती वसुली केली जात आहे, अबकारी खात्यातील बदलीच्या धंद्यात कोणत्या स्तरावरील अधिकाऱ्याला किती लाच देण्यात आली याचा उलगडा झाला आहे. प्रसारमाध्यमांनी त्याची माहिती दिली आहे. हेच पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात सांगितले असून त्यांनी कोणताही खोटा आरोप केलेला नाही, असेही आर. अशोक यांनी स्पष्ट केले.