पीडीओ परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप
कल्याण कर्नाटक भागातील उमेदवारांनी रास्तारोको करून छेडले आंदोलन, फेरपरीक्षा घेण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेंगळूर
कल्याण कर्नाटक (हैदराबाद-कर्नाटक) भागातील पंचायत विकास अधिकाऱ्यांच्या (पीडीओ) परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप झाल्याने उमेदवारांनी रास्ता रोको करून आंदोलन केले. रविवारी ही परीक्षा झाली असून रायचूरच्या सिंधनूर शहरातील पदवीपूर्व कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका प्रश्नपत्रिका बंडलमध्ये 24 ऐवजी 12 प्रश्नपत्रिका आढळून आल्याची तक्रार केली आहे. दरम्यान, उमेदवारांनी रास्ता रोको करून केपीएससीचा निषेध व्यक्त केला. आजची परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलक उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. रास्ता रोकोमुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली.
जोपर्यंत फेरपरीक्षेचा निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे उमेदवारांनी ठणकावून सांगितले. कर्नाटक लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षांमध्ये होत असलेला गैरप्रकार टाळण्यासाठी पुरेशी खबरदारी घेतली असल्याचे सागितले आहे. असे असतानाही परीक्षेतील गैरप्रकार सुरूच आहेत. प्रामाणिकपणे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होत आहे. केपीएससीद्वारे घेतलेल्या परीक्षांमधील अनियमितता नियंत्रणात येत नसल्यामुळे अलीकडेच पीएसआयसह काही पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षा कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाकडून घेण्यात आल्या.
यापूर्वी पीएसआय पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये कलबुर्गीसह कल्याण कर्नाटकातील भागात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे राज्यातच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरही खळबळ उडाली आणि मोठा वाद निर्माण झाला होता. तसेच परीक्षेच्या पावित्र्याबाबत मोठे प्रश्न उपस्थित झाले होते. उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली आणि राज्य सरकारने परीक्षेतील गैरप्रकार मान्य करून परीक्षा अधिसूचनाच रद्द केली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार परीक्षा प्राधिकरणाकडून परीक्षा घेण्यात आल्या. कल्याण कर्नाटकातील रायचूरमध्ये पीडीओ परीक्षेत अनियमितता झाल्याचे आता लक्षणीय आहे.