स्वत:चे अपयश लपविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे विरोधकांकडे बोट
बदनामीच्या आरोपांना ‘आप’चे उत्तर
पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार विविध कारणांसाठी पूर्णपणे बदनाम झाले आहे आणि ते काम त्यांचेच अंतर्गत हितशत्रू करत आहेत. अशा या सरकारला बदनाम करण्यासाठी वेळ खर्ची घालण्याची आम्हा विरोधकांना गरज नाही. आमचा हा दावा खोटा असेल तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या आयटी सेलला कामाला लावावे, सत्य उघड होईल, असे आव्हान आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी दिले आहे. बुधवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारची सध्या चाललेली बदनामी हे विरोधकांचे षडयंत्र असल्याचा आरोप हा भाजपचा बनाव आहे.
ही अंतर्गत धुसफूस त्यांच्यासाठी सहनशिलतेच्या पलिकडे पोहोचली आहे. त्यातूनच मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाचा संयम सुटला आहे. अशा आरोपांना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्रीही स्वत: व्हिडीओ जारी करतात यावरूनच हे सिद्ध होत आहे. मुख्यमंत्र्यांची ही कृती एखाद्या बिगर सरकारी संघटनेच्या कार्यपद्धतीसारखी आहे, असे पालेकर म्हणाले. सरकारची आणि मुख्यमंत्र्यांची खरोखरच बदनामी होत होती तर त्यांनी लगेचच पोलीस आणि आयटी सेलला कामाला लावायला हवे होते. व्हिडीओच्या आयपी पत्त्यावरून बदनामीकारक व्हिडीओ कुणी जारी केला ते सिद्ध झाले असते. परंतु तसे न करता मुख्यमंत्री विरोधकांकडे बोट दाखवत आहेत. हा केवळ लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, असे पालेकर यांनी सांगितले.