For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्याने आदरातिथ्याची परंपरा जपली

10:36 AM Oct 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोव्याने आदरातिथ्याची परंपरा जपली
Advertisement

केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे प्रशंसोद्गार : 54 व्या भारतीय पर्यटन परिषदेचे उद्घाटन

Advertisement

पणजी : भारतात आदरातिथ्य उद्योगातील सर्वात महत्त्वपूर्ण परिषद म्हणून फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या या परिषदेला (एफएचआरआयए) ओळखले जाते. या परिषदेने आदरातिथ्य क्षेत्रातील नेते, उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि देशभरातील संबंधित घटकांना आकर्षित केले आहे. सर्वजण नवकल्पना, धोरणे आणि सर्जनशील विचार शोधण्यासाठी गोव्यात एकत्र आले आहेत. आदरातिथ्याच्या बाबतीत गोव्याने आपली पारंपरिक संस्कृती जोपासल्याचे दिसून येते. त्यामुळेच गोवा राज्याकडे उद्योग क्षेत्राचे भविष्य घडविण्याची क्षमता आहे, असा आपल्याला ठाम विश्वास आहे अशा शब्दांत केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी कौतुक केले. फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाची  (एफएचआरआयए) 54 वी वार्षिक परिषद काल शुक्रवारी ताज सिदादे दी गोवा होरायझन येथे झाली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आयएचसीएलचे अध्यक्ष श्यामा राजू, आयएचसीएलचे संचालक पुनीत छटवाल, एफएचआरएआयचे अध्यक्ष प्रदीप शेट्टी आणि उपाध्यक्ष सुरेंद्रकुमार जयस्वाल उपस्थित होते.

दर्जा राखण्याचा प्रयत्न

Advertisement

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, पर्यटन पायाभूत सुविधांमध्ये धोरणात्मक गुंतवणूक आणि दूरगामी उपक्रमांद्वारे गोवा राज्य जागतिक दर्जाचे स्थान म्हणून आपला दर्जा उंचावण्याच्या मोहिमेवर भर देत आहे. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना संस्कृती, वारसा आणि आधुनिकता यांचे मिश्रण असणारे अनोखे अनुभव देऊन गोव्याला पर्यटकांना आनंद द्यायचा आहे. अशा परिषदांसारखे कार्यक्रम उद्योगातील प्रभावी विचार आणि निर्णय घेणाऱ्यांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हे कार्यक्रम आमच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचे भविष्य, नावीन्य, सहयोग आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी व्यासपीठ म्हणून काम करतात, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

पर्यटनाला प्रोत्साहन देण्यास वचनबद्ध

पर्यटनमंत्री खंवटे म्हणाले, राज्याचा समृद्ध सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा याकडे पाहण्याची आमची दृष्टी येथील समुद्रकिनाऱ्यांच्या मोहापलीकडे पसरलेली आहे. आम्ही पर्यटनाला चालना देण्यासाठी वचनबद्ध आहोत. पर्यटन स्थानिक समुदायाला सक्षम बनवते. पर्यटनाचे फायदे समान रीतीने सामायिक केले जातील. ताज ग्रुपचे संचालक पुनीत छटवाल यांनी प्रमुख वत्ते म्हणून विचार मांडले. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील वर्तमान स्थिती आणि भविष्यातील संधींची रूपरेषा आखण्यासाठी त्यांनी उद्योगातील त्यांच्या विशाल अनुभवावर आधारित प्रेरणादायी भाषण दिले. त्यांचे भाषण नवकल्पना, तंत्रज्ञानाचा वापर आणि आदरातिथ्यातील उत्कृष्टतेची मानके पुन्हा परिभाषित करण्यासाठी अतिथी-केंद्रित सेवांचे महत्त्व, यावर आधारित होते.

अनेक मान्यवरांचा गौरव

आदरातिथ्य जगतातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व दिवंगत प्रल्हाद सिंग ओबेरॉय यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करणे, हे या दिवसाचे खास आकर्षण होते. ईआयएच लिमिटेडचे माजी कार्यकारी अध्यक्ष जी. एस. ओबेरॉय यांनी हा पुरस्कार स्वीकारून कृतज्ञता व्यक्त केली. ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित बी. केरकर, लीला ग्रुप ऑफ हॉटेल्सचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत कॅप्टन सी. पी. कृष्णन नायर आणि ललित सुरी हॉस्पिटॅलिटी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ललित सुरी यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि आदरातिथ्य क्षेत्रावरील त्यांचे चिरस्थायी योगदान ओळखून ‘हॉल ऑफ फेम’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ललित सुरी यांच्या पत्नी जोशना सुरी यांनी स्वीकारला.

Advertisement
Tags :

.