For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजकोट घटनेच्या तपासासाठी तांत्रिक संयुक्त समिती नेमणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

01:26 PM Aug 29, 2024 IST | अनुजा कुडतरकर
राजकोट घटनेच्या तपासासाठी तांत्रिक संयुक्त समिती नेमणार   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Advertisement

मालवण । प्रतिनिधी

Advertisement

मालवण तालुक्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्दैवी घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते. पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला. शिवरायांच्या कर्तृत्वास व लौकीकास साजेसा भव्य आणि उत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही सार्वजनिक बांधकाम विभागाने नेमावी. उभारल्या जाणाऱ्या पुतळ्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले .छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नव्याने भव्य स्वरुपात तयार करणे आणि उभारणे यासाठी जे.जे. स्कूल ऑफ आर्टस, आयआयटी, स्थापत्य अभियंते, महाराष्ट्रातील नामांकित शिल्पकार, तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची एक समिती देखील नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, झालेली घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. नौदलाने हा पुतळा राजकोट येथे नौदल दिन साजरा करण्याच्या निमित्ताने एका चांगल्या भावनेने उभारला होता. भविष्यात आपल्याला अशी दुर्घटना परत कधीच घडू नये यासाठी अतिशय काळजी घेतली पाहिजे. उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.