विधानसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्गात सुमारे ७२ टक्के मतदान
- सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी
जिल्ह्यात शांततेत झाले मतदान
१७ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद मात्र विद्यमान आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक,नितेश राणे या दिग्गजांची लागली प्रतिष्ठा पणाला
आता २३ रोजी होणाऱ्या मतमोजणी व निकालाकडे लक्ष
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन जागांसाठी बुधवारी सुमारे ७२ टक्क्यापर्यंत मतदान झाले आहे. कुठेही अनुचित प्रकार न घडता कडेकोट पोलीस बंदोबस्तात जिल्ह्यातील सर्व ९२१ मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले . नव मतदारापासून वृद्ध मतदारापर्यत सर्वच मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या काही घटना घडल्या. मात्र तात्काळ मतदान यंत्र बदलून देण्यात आली होती. दरम्यान जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाच्या तीन जागांसाठी १७ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. मात्र , विद्यमान आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक,नितेश राणे या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे आता २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणी व निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे.