Devendra Fadanvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंदगड दौऱ्यावर !
मुख्यमंत्री फडणवीस आज चंदगडमध्ये जाहीर सभेला उपस्थित
चंदगड : चंदगड जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपाला बळ देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार दि. ३० नोव्हेंबर रोजी चंदगड तालुक्यात येत आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
बेळगाव-वेंगुर्ले रस्त्यालगत हिंडाल्को कॉलनीतील ग्राऊंडवर त्यांची जाहीर सभा होणार आहे. चंदगड तालुका विकासाच्या दृष्टीने अधिक प्रगत व्हावा, यासाठी विविध मागण्या आमदार शिवाजी पाटील यांनी त्यांच्याकडे आधीच केलेल्या आहेत. प्रामुख्याने बेळगाव-वेंगुर्ला राज्य मार्ग, कोलीक ते गोव्याला जोडणारा रस्ता, नागपूर ते गोवा रस्ता, चंदगड शहराचा स्मार्ट सिटीसारखा विकास करणे आदी गोष्टींचा त्यात समावेश आहे.
चंदगड तालुका पर्यटनाच्या माध्यमातून विकसित होऊ शकतो. गोबा-कर्नाटक आणि कोकणाच्या संगमावर चंदगड तालुका बसलेला असून चंदगडपासून मोपा विमानतळ केवळ ५० कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे दळवळणाच्या सोयी अत्याधुनिक झाल्यास अत्यल्प वेळेत ये-जा करणे सुलभ होईल. रस्त्यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळेल. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातही हॉटेल व्यवसायात चंदगड तालुक्याने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे.
चंदगड तालुक्यातच पर्यटनाच्या माध्यमातून येथील निसर्ग, गडकोट, धबधबे यांचे संवर्धन झाल्यास हॉटेल व्यवसायाला मोठी गती येईल. तरुणांना रोजगाराची चांगली संधी मिळू शकते. तालुक्यात आयुष हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आदी बाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली भूमिका या भेटीत जाहीर करतील, अशी अपेक्षा आहे. कृषि पर्यटनातूनही चंदगड तालुका प्रसिध्दीस येऊ शकतो.
प्रतिमहाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदगड तालुक्यात पर्यटन वाढीचीही संधी आहे. तालुक्यात मत्स्य शेतीबरोबरच वॉटर स्पोर्ट्ससारख्या संकल्पना राबविता येऊ शकतात. चंदगड तालुक्यात मनोहर जोशी, शरद पवार, अशोक चव्हाण यांच्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंदगडला येत आहेत. त्याचा लाभ चंदगड तालुक्याला मिळेल, अशी आशा चंदगडकर व्यक्त करीत आहेत.