मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी
विजापूर, कलबुर्गी, यादगीर, बिदर जिल्ह्यांतील परिस्थितीचा घेतला आढावा : नुकसानग्रस्तांसाठी तातडीने मदत देण्याचे निर्देश
प्रतिनिधी/ बेंगळूर
महाराष्ट्रात तसेच उत्तर कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून भीमा आणि कृष्णा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. परिणामी कलबुर्गी, बिदर, विजापूर, यादगीर जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कल्याण कर्नाटकातील पूरस्थितीची विशेष हेलिकॉप्टरमधून हवाई पाहणी केली. तसेच कलबुर्गी विमानतळावर कलबुर्गी, बिदर, यादगीर आणि विजापूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकाऱ्यांची व जिल्हा पालकमंत्र्यांची बैठक घेत सविस्तर माहिती घेतली.
गेल्या काही दिवसांपासून भीमा आणि कृष्णा नद्यांच्या खोऱ्यात जोरदार पाऊस होत असून अनेक भागात पीकहानी व पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागाची पाहणी करण्यासाठी मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या बेंगळूरहून विशेष विमानाने कलबुर्गीला पोहोचले. त्यानंतर त्यांनी हेलिकॉप्टरमधून पूरग्रस्त भागांची पाहणी केली. 2 तासांहून अधिक वेळ त्यांनी कलबुर्गी, बिदर, यादगीर आणि विजापूर जिल्ह्यांतील काही भागांची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत मंत्री प्रियांक खर्गे, ईश्वर खंड्रे, कृष्णभैरेगौडा, डॉ. शरणप्रकाश पाटील हे देखील होते.
हवाई पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी कलबुर्गी विमानतळावर चारही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत सीईआाs व जिल्हा पालकमंत्र्यांची बैठक घेतली. पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांपासून सूचना दिल्या. बैठकीत कल्याण कर्नाटक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अजय सिंग, मंत्री चेलुवरायस्वामी, भैरती सुरेश, एम. बी. पाटील तसेच विविध आमदारही उपस्थित होते.
बैठकीप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागात युद्धपातळीवर मतदकार्य हाती घेण्याचे निर्देश दिले. तसेच पुरामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी खबरदारी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. पूरग्रस्तांता तातडीने भरपाई द्यावी. घरे गमावलेल्यांना घरे बांधण्यासाठी निधी मंजूर करावा. पूरग्रस्तांता निवारा केंद्रांमध्ये हलवावे. आहार, पाण्याची व्यवस्था करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. निवारा केंद्रांमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधांचा आढावा देखील मुख्यमंत्र्यांनी घेतला.
सर्वेक्षण पूर्ण होताच भरपाई : सिद्धरामय्या
उत्तर कर्नाटकात भीमा नदी खोऱ्यात पुरामुळे नुकसान झालेल्या 5 लाख हेक्टर क्षेत्राचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहेत. पाऊस कमी होताच उर्वरित सर्वेक्षणही पूर्ण केले जाईल. त्यानंतर आम्ही भरपाई देणार आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच्या पीक नुकसानीचे संयुक्त सर्वेक्षण पूर्ण होऊन भरपाई वाटपाची तयारी सुरू असतानाच पुन्हा पावसामुळे पीकहानी झाली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर झालेल्या पिकहानीचे सर्वेक्षण पूर्ण करून एकत्रित भरपाई देणे योग्य ठरेल, असे ठरविण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
अंदाजे 9 लाख हेक्टरवरील पिकांची हानी : चेलुवरायस्वामी
राज्यात मुसळधार पावसामुळे खरीप हंगामात 9 लाख हेक्टर क्षेत्रात पीकहानी झाल्याचा अंदाज आहे. उत्तर कर्नाटकातील चार जिल्ह्यांमध्येच 6 ते 7 लाख हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे, असे कृषीमंत्री एन. चेलुवरायस्वामी यांनी सांगितले. कलबुर्गी येथे मंगळवारी पत्रकारांशी ते बोलत होते. नैसर्गिक आपत्ती कोणाच्याही हातात नाही. पीकविमा केलेल्या सर्वांना भरपाई मिळणार आहे. शिवाय पीकविमा न केलेल्या शेतकऱ्यांनाही सरकारकडून मदत देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत चर्चा करून निर्णूय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितलेण् आहे.
राज्य सरकारकडून भरपाईसाठी हेक्टरी अतिरिक्त 8,500 रु.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एनडीआरएफ भरपाईव्यतिरिक्त अतिरिक्त पॅकेज जाहीर केले आहे. एनडीआरएफ नियमांनुसार कोरडवाहू शेतीससाठी प्रतिहेक्टर 8,500 रु., सिंचनयुक्त शेतीसाठी प्रतिहेक्टर 17 हजार रु. आणि बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 रु. भरपाई दिली जाते. एनडीआरएफच्या मदतीव्यतिरिक्त राज्य सरकार प्रतिहेक्टर 8,500 रु. अतिरिक्त भरपाई देणार आहे. एनडीआरएफचे पॅकेज अधिक राज्य सरकारचे 8,500 रु. पॅकेज मिळून भरपाई दिली जाणार आहे. सर्वेक्षणकार्य पूर्ण झाल्यानंतर ही भरपाई दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.