चिकनच्या दरात घसरण; 170 रु. किलो
बर्ड फ्लू-वाढत्या उष्णतेचा परिणाम : अंडी शेकडा 430 रुपये
बेळगाव : वाढता उष्मा आणि बर्ड फ्लूच्या भीतीमुळे चिकनच्या खरेदीत घट झाली आहे. परिणामी गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात प्रति किलो 20 रुपयांनी चिकनचा दर उतरला आहे. सध्या 170 ते 180 रुपये प्रति किलो दराने चिकनची विक्री सुरू असून अंडी शेकडा 430 रुपये प्रमाणे विक्री केली जात आहेत. बर्ड फ्लू रोगामुळे महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. त्यामुळे कोंबड्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. खबरदारी म्हणून सीमावर्ती भागात जिल्हा प्रशासनाकडून चेकपोस्ट सुरू करण्यात आले असल्याने सध्या तरी बेळगाव जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नाही. चिकन खाल्ल्याने बर्ड फ्लू होतो यात तथ्य नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मात्र मांस खाताना ते चांगले शिजविणे गरजेचे आहे. पण महाराष्ट्रात कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण होत असल्याने पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कुक्कुट पालन व्यवसाय केला जातो. त्यातच यंदा उष्णतेत मोठी वाढ झाली असल्याने ग्राहकांनी चिकन खरेदीकडे पाठ फिरविली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात चिकनचा दर 20 रु.नी घसरला असून 170 ते 180 रु. प्रति किलो चिकनची विक्री सुरू आहे. कोंबड्यांचा पुरवठा व्यवस्थित असला तरी चिकन खवय्यांची संख्या मात्र कमी झाली आहे. सध्या अंडी शेकडा 430 रु. विक्री केली जात आहेत. रंगपंचमीनंतर चिकनच्या दरात वाढ होईल अशी शक्यता चिकन विक्रेत्यांतून व्यक्त केली जात आहे.