भारतीय फुटबॉल संघातून छेत्रीला डच्चू
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आशिया चषक पात्र फेरीच्या बांगलादेश बरोबर होणाऱ्या आगामी सामन्यासाठी भारतीय फुटबॉल संघाची घोषणा करण्यात आली असून प्रमुख प्रशिक्षक खलिल जमील यांनी अनुभवी सुनील छेत्रीला वगळण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना 18 नोव्हेंबरला ढाका येथे होणार आहे.
आशिया चषक फुटबॉल स्पर्धा सौदीअरेबियात 2027 साली खेळविली जाणार आहे. या प्रमुख स्पर्धेत स्थान मिळविण्याचे भारताचे आव्हान यापूर्वी संपुष्टात आले आहे. आता 18 नोव्हेंबरचा बांगलादेशबरोबरच सामना हा औपचारिक राहील. गेल्या महिन्यात गोव्यातील मडगाव येथे झालेल्या पात्र फेरीच्या सामन्यात सिंगापूरने भारताला 2-1 अशा गोलफरकाने पराभूत केल्याने भारताचे आगामी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. बांगलादेशमध्ये होणाऱ्या या आगामी सामन्यासाठी 23 सदस्यांचा संघ 15 नोव्हेंबरला ढाकाला रवाना होईल.
भारतीय फुटबॉल संघ: गोलरक्षक-गुरूप्रित सिंग संधू, ऋतिक तिवारी, साहील, बचावफळी आकाश मिश्रा, अन्वर अली, विकास युमनाम, एच. राळते, मोहम्मद युविस, परमवीर, राहुल भेके, संदेश जिनगेन, मध्यफळी-ए. कुर्नियान, बी. फर्नांडीस, एल. फेनाई, एम. निक्सन, महेश सिंग नावोरेम, निखिल प्रभू, सुरेश सिंग, वेंगजाम, आघाडी फळी - इरफान यादवाड, एल. चेंगटे, मोहम्मद सेनान, रहीम अली व विक्रम प्रताप सिंग.