छत्तीसगड ः 6 मजुरांचा खाण कोसळून मृत्यू
रायपूर
छत्तीसगडमधील बस्तर जिह्यात असलेल्या एका मातीच्या खाणीत शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली. खाणकाम सुरू असताना मातीचा ढिगारा अंगावर कोसळल्याने काम करणाऱया 6 मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला. यामध्ये 5 महिला आणि एका पुरुष कामगाराचा समावेश आहे. ढिगाऱयाखाली आणखी काही लोक दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी दिवसभर मदत व बचावकार्य सुरू होते. या घटनेच्या अधिक चौकशीसाठी पोलीस प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
बस्तर जिल्हय़ातील माझगाव येथे सध्या खाणकाम सुरू आहे. या खाणीत उत्खननाचे काम सुरू असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळला. यादरम्यान खाली असलेले मजूर ढिगाऱयाखाली गाडले गेले. शेजारी उभ्या असलेल्या इतर मजुरांनी तातडीने याची माहिती प्रशासनाला दिली. त्यानंतर बचावकार्य हाती घेण्यात आले. मात्र, सहा जणांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्मयता वर्तवली जात आहे.