फर्मागुढीत साकारणार छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय
पर्वरीत उभारणार ‘टाऊन स्क्वेअर’ प्रकल्प : दोन्ही प्रकल्पांसाठी केंद्राकडून 188 कोटी
पणजी : पर्यटन विकास योजनेंतर्गत गोवा सरकारला केंद्राने रु. 188.21 कोटीचे बिनव्याजी कर्ज मंजूर केले असून त्या निधीतून फोंडा येथे छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल संग्रहालय साकारण्यात येणार आहे. तसेच पर्वरी येथे ‘टाऊन स्क्वेअर’ हा प्रकल्प उभारला जाणार आहे. वरील दोन्ही प्रकल्पांना अनुक्रमे रु. 97 व रु. 90 कोटी खर्च होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकल्पामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास आता डिजिटल स्वरुपात पाहायला मिळणार आहे. गोवा राज्यासाठी हे संग्रहालय वैशिष्ट्यापूर्ण ठरणार असून ते फर्मागुढी --फोंडा येथील शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या किल्ल्याशेजारी उभारण्याची योजना आहे. पीपीपी म्हणजे खासगी - सार्वजनिक भागिदारीतून हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
सदर प्रकल्पात किल्ल्याचे सुशोभिकरणाचे नियोजनही आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरुन हे संग्रहालय उभारले जाणार असून शिवाजी महाराज जीवनगाथा येथे साकारण्यात येणार आहे. त्यांचे चरित्र डिजिटल स्वरुपात पाहण्याची पर्वणी त्यातून मिळणार असून तो अनुभव घेण्यासारखा आहे, असे सूत्रांनी नमूद केले. मराठा साम्राज्याची भव्यता यातून दिसणार आहे. पर्वरी येथील ‘टाऊन स्क्वेअर’ प्रकल्पात पार्किंग, कॅचटॉवर, संगीत रोषणाईचे कारंजे व इतर आकर्षण यांचा समावेश आहे. गोव्याचे सांस्कृतिक जीवनाचे प्रदर्शन तेथे मांडले जाणार असून संगीत नृत्य कला व इतर गोष्टींनाही तेथे स्थान मिळणार आहे. हे दोन्ही प्रकल्प पर्यटनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून पर्यटन वाढणार, अशी अपेक्षा आहे.